मुंबई : शाहरूख खानसोबत 'दिल वाले दुल्हनियां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मंदिरा बेदी आपल्या स्टाइलमुळे कायमच वेगळी ठरली आहे. मंदिराने बॉलिवूडबरोबरच अनेक टीव्ही मालिकांमध्ये म्हणजे 'शांती', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'जस्सी जैसी कोई नही' मध्ये काम केलं आहे.
याबरोबरच मंदिराने स्पोर्ट्स कमेंटेटर म्हणून देखील काम केलं आहे. मंदिराने आतापर्यंतच्या करिअरमध्ये खूप नाव कमावलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीला खासगी आयुष्यातील खूप गोष्टींना मागे टाकावं लागलं.
नुकतंच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, मंदिरा बेदीने खूप मोठा आणि महत्वाचा खुलासा केला आहे. तिने तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मंदिरा २० वर्षांची असताना तिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. वयाच्या ३० व्या वर्षी मला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, असं मंदिरा सांगते. पण आता वयाच्या ४० नंतर मी खूप चांगल अनुभवत आहे. मी स्वतःवर प्रेम करू लागली आहे, असं मंदिरा बेदी या मुलाखतीत म्हणाली.
मंदिराने खुलासा केला की, सुरूवातीच्या काळात माझ्यामध्ये एक भीती होती. माझं करिअर कधीही संपू शकतं. इतर कलाकार माझ्यापेक्षा जास्त मेहनत करत होते. मला सर्वात जास्त भीती तेव्हा वाटली जेव्हा २०१० मध्ये माझ्या जागी एका वेगळ्या स्पोर्टस अँकरला घेण्यात आलं. तेव्हा लोकं मला विचारायचे की, तू क्रिकेट समालोचकची नोकरी सोडलीस का? तेव्हा मला हे स्विकारायला वेळ गेला की, मी नोकरी सोडली नाही तर मला बदलण्यात आलं आहे.
मंदिरा बेदीने १९९९ मध्ये दिग्दर्शक राज कौशलसोबत विवाह केला. यानंतर तब्बल १२ वर्षांनी मंदिराने मुलाला जन्म दिला. लग्नानंतर इतक्यावर्षांनी मातृत्व या प्रश्नावर मंदिराने दिलेलं उत्तर अतिशय धक्कादायक आहे.
मंदिरा म्हणाली की, मी जेव्हा ३९ वर्षांची होती तेव्हा मी मुलाला जन्म दिला. माझ्या व्यावसायिक करारानुसार मी आई होऊ शकत नव्हती. मला भीती होती की, जर मी गरोदर राहिले तर माझं करिअर संपेल. हा काळ खूप कठीण होता. पण याकाळात माझे वडिल माझ्यासोबत होते.