मुंबई : नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. मोठ्या थाटात देवी सर्वत्र विराजमान झाली आहे. मात्र त्याच देवीचं वाहन कोठे आहे? असा सवाल मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियाच्या माध्यमातून उठवला आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर ती सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या दिवशी महालक्ष्मी अशा रुपांमध्ये दिसणाऱ्या तेजस्विनीने पाचव्या दिवशी 'शेरावाली माते'चं रूप धारण केलं आहे.
'वाजत गाजत आणलस खरं मला..बसवणार कुठे? कुठे आहे माझं वाहन? कशावर आरूढ होणार मी? तुझ्या अस्त्वित्वाचा पसारा वाढवताना तू माझ्या दुसऱ्या लेकाचा आसरा नष्ट केलास. त्याच्या कातडीसाठी त्याच्या नखांसाठी त्याचा जीव घेतलास? अरे वेड्या तू त्याचे अस्तित्व संपवत नाहीयेस फक्त ...तुझेही संपवतोयस. अन्न साखळी विसरलास? ‘परस्पर-पूरकता’ विसरलास?
समतोल ढासळलाय......माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेली सृष्टी मला विनाश होताना दिसतेय....मी हतबल आहे...माझ्या हाती शस्त्र आहेत पण त्यांचा वापर करून तुमची हि वृत्ती मी कशी घालवणार? अशा प्रकारचे वास्तवदर्शी फोटो शेअर करत ती समाजामध्ये जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.