सुपरस्टारच्या घरी तान्हुल्याचं आगमन, सोशल मीडियावरुन दिली माहिती

गेल्या वर्षीच.....

Updated: Oct 31, 2019, 10:12 AM IST
सुपरस्टारच्या घरी तान्हुल्याचं आगमन, सोशल मीडियावरुन दिली माहिती  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी मंडळी आणि चाहत्यांमध्ये असणारी एक दरीच कमी झाली आहे. परिणामी फक्त चाहतेच या माध्यमातून त्यांच्या आवडीच्या सेलिब्रिटीप्रती प्रेम व्यक्त करतात असं नाही. तर, सेलिब्रिटी मंडळीसुद्धा त्यांच्या जीवनातील बऱ्याच प्रसंगांविषय़ी माहिती देत असतात. सध्या अशाच एका सेलिब्रिटीने त्याच्या जीवनात आलेल्या एका अतिशय खास पाहुण्याविषयी सांगितलं आहे. 

हा सेलिब्रिटी आहे, 'केजीएफ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता यश. त्याने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमधून पत्नी राधिता पंडीत आणि त्याच्या जीवनात एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं त्याने सांगितलं आहे. 

गेल्या वर्षीच यश आणि त्याची पत्नी राधिका यांना कन्यारत्न प्राप्त झालं होतं. ज्यानंतर साधारण वर्ष- दीड वर्षाच्या कालावधीत त्यांच्या या नात्यात आणखी एका पाहुण्याची चाहूल लागली. याचविषयी राधिकाने एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिची प्रतिक्रिया दिली होती. 

दुसऱ्या गरोदरपणाविषयी बोलताना राधिका म्हणाली होती, 'अतिशय कमी काळाच्या अंतराने आमच्या दोन्ही मुलांचं स्वागत होत असणं यात आमचंच नशीब आहे. आम्ही त्यांच्या येण्याने उत्सुक आहोत, यात शंकाच नाही. माझ्या मते हा देवाचाच आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा अशी छान आनंदाची बातमी चाहत्यांना सांगण्याची संधी मिळणं यात आम्ही आमचं भाग्यच समजतो.' यावेळी तिने बाळाच्या येण्याप्रतीचा आनंद व्यक्त केला होता.