Johnny Lever gift to Namarata Sambherao : 'हास्यजत्रा' फेम नम्रता ही तिच्या लॉली या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिचे लाखो चाहते आहेत. नम्रताच्या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रिटी आणि त्यातल्या त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आहेत. नम्रतानं 'झी24 तास' ला दिलेल्या मुलाखतीत कोणत्या सेलिब्रिटींची तिच्या कामाची स्तुती केली आणि त्यावेळी तिला कसे वाटले याविषयी सांगितलं आहे.
यावेळी नम्रताला विचारण्यात आलं की बिग बींपासून जॉनी लिव्हर पर्यंत अनेकांनी तुझं कौतुक केलं... असं कधी झालं का की तुम्ही कोणती कमेंट ऐकूण भारावलीस? त्यावर उत्तर देत नम्रतानं जॉनी लिव्हर यांच्यापासून सुरुवात केली. 'विनोदाचे बादशाह जॉनी लिव्हर! ज्यांनी बॉलिवूड गाजवलं असे सगळ्यांचे लाडके जॉनी लिव्हर. आम्ही दमनमध्ये शूट करत होतो. कोव्हिडमध्ये शूट करण्यास परवाणगी नव्हती, तर आम्ही बायो-बबलमध्ये शूट करत होतो. त्यावेळी आम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो. एक दिवस आम्ही शूट करत होतो आणि रिहर्सलच्या दिवशी अचानक मोटे सरांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी एका खास व्यक्तीचा फोन आला आहे. त्यातही त्यांनी खूपजणांकडून व्हाया व्हाया कॉन्टॅक्ट करून नंबर मिळवला आणि आता ते माझ्यापर्यंत आलेत. त्यानंतर त्यांनी कॉन्फर्स कॉलवर मला घेतलं', असं नम्रता म्हणाली.
पुढे कॉलवर काय बोलणं झालं हे सांगत नम्रता म्हणाली, "समोरून फोनवर एक आवाज आला. 'जॉनी लिव्हर बात कर रहां हुँ.' तर मला कळेच ना की जॉनी लिव्हर सरांना आपल्याशी बोलावसं वाटतंय. मग त्यांनी सांगितलं की 'त्यांनी लॉलीचं पोटऱ्यांचं स्किट पाहिलं. त्यावेळी ते खूप व्हायरल झालं होतं आणि त्यांच्यापर्यंत ते असंच पोहोचलं. मग जेव्हा ते आम्हाला एका एपिसोडमध्ये भेटायला आले, तेव्हा त्यांनी ते स्किट मला आणि प्रसादला परफॉर्म करून दाखवलं. आम्ही व्हॅनिटीचा दरवाजा उघडला आणि त्यानंतर त्यांनी ते स्किट करून दाखवलं. तेव्हा मला असं झालं की हा किती मोठा माणूस आहे. किती मोठा कलाकार आहे. त्यानं माझ्या कामाची स्तुती केली म्हणजेच माझ्या कामाची हिच पावती आहे, असं मला वाटलं. त्यानंतर त्यांनी मला एक GUESS चं घड्याळ आणि सोन्याचं एक पेंडंट गिफ्ट केलं. ते गिफ्ट मी ते अजूनही तसंच ठेवलं आहे. ते पेंडंट गळ्यात घालाव आणि मिरवावं अशी माझी हिंमतच झाली नाही. माझ्यासाठी ती देवाकडून आलेली भेट आहे. त्यामुळे ती मी अशी जपून ठेवली आहे. कारण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.'
नम्रताच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यावेळी नम्रतासोबत हास्यजत्रेतील अनेक कलाकार दिसणार आहेत. तर प्रसाद खांडेकर चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.