मुंबई : आवाजाच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवणाऱ्या गायिका कनिका कपूर हिने काही दिवसांपूर्वी बऱ्याच अडचणींचा सामना केला. परदेशवारी करुन आलेल्या या गायिकेला Coronavirus कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर तातडीनं तिच्यावर उपचार करण्यात आले.
बरेच दिवस कोरोनाशी लढूनही तिच्या चाचणीचे सुरुवातीचे अहवाल हे पॉझिटीव्हच येत होते. अखेर या कोरोनावर तिनं मात केली आणि पुढील काही दिवसांसाठी आराम करत आता कनिका कोविड 19 च्या संसर्गातून पूर्णपणे सावरली आहे. सध्या ती लखनऊ येथे आपल्या आई- वडिलांसमवेत राहत आहे.
कोरोनातून सावरुनही कनिकाला एका गोष्टीची सतत चिंता लागून राहिली आहे. ही चिंता आहे तिच्या मुलांची. कनिकाची मुलं ही परदेशात आहेत. तर, ती मात्र भारतात. त्यातही लॉकडाऊन सुरु असल्यामुळं तिच्या आपल्या मुलांची भेट घेता येणं अशक्य आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमतून आपल्याला मुलांची आठवण येत असल्याचं तिनं लिहिलं आहे.
कनिकानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्येत अयाना, समारा आणि युवराज ही तिची तिन्ही मुलं दिसत आहेत. तेव्हा आता लॉकडाऊन कधी संपतो याचीच प्रतीक्षा तिला लागली असणार असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दरम्यान, कोरोना विषाणूवर मात केल्यानंतर कनिका कपूरने तिचा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला होता. या प्लाझ्माचा वापर कोरोनाच्या रुग्णांवर सहज उपचार करता येतील आणि इतर जीव तिच्या प्लाझ्मापासून वाचू शकतील, अशा तिच्या भावना होत्या.