दीपिका पदुकोण, संजय लीला भन्साळी आमनेसामने

....या कारणामुळे एकमेकांसमोर उभे ठाकणार   

Updated: Oct 30, 2019, 03:30 PM IST
दीपिका पदुकोण, संजय लीला भन्साळी आमनेसामने  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कायमच तिच्या चित्रपटांच्या निवडीमुळे प्रकाशझोतात असते. त्यातही काही दिग्दर्शक आणि सहकलाकारांसोबतचं तिचं खास नातं. अशाच मंडळींमधील एक नाव म्हणजे चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. एक अभिनेत्री म्हणून दीपिकाच्या कारकिर्दीत तिला मिळालेल्या लोकप्रियतेत भन्साळींचा महत्त्वाचा वाटा. हे खुद्द दीपिकाही नाकारत नाही. पण, आदर्शस्थानी आणि अतिशय महत्त्वाच्या अशा याच व्यक्तीसोबत येत्या काळात तिचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

दीपिका आणि भन्साळींमध्ये वाद? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? बी- टाऊनची ही आघाडीची अभिनेत्री येत्या काळात तिला यशशिखरावर पोहोचवणाऱ्या दिग्दर्शकाच्या म्हणजेच भन्साळींच्या विरोधात उभी ठाकणार आहे. यामागचं कारण आहे या दोघांचेही आगामी चित्रपट. सध्याच्या घडीला दीपिका आणि भन्साळी हे दोघंही त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांवर काम करत आहेत. 

'बाजीराव मस्तानी', 'राम-लीला' आणि 'पद्मावत' या भव्यतेची परिसीमा बदलणाऱ्या चित्रपटांमध्ये भन्साळींनी दीपकाला पसंती दिली. तिने या संधीचं सोनं करत अभिनेत्री म्हणून स्वत:च्या प्रगतीचा आलेख उंचावला. सोबतच, दिग्दर्शक म्हणून भन्साळी यांच्या आखणीला रुपेरी पडद्यावर सुरेखपणे मांडलंही. आता मात्र ही दोन्ही मंडळी या स्पर्धेत वेगवेगळ्या चित्रपटांवर काम करत आहेत. 

 

दीपिका ही 'महाभारत' या महाकाव्यावर आधारित चित्रपटातून द्रौपदीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची सहनिर्माती म्हणूनही तिच्यावर जबाबदारी असेल. तर, भन्साळी त्यांच्या 'बैजू बावरा' या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. महाभारतावर आधारित चित्रपटाचा पहिला भाग हा २०२१ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. तर, संजय लीला भन्साळी यांचा बैजू बावरा हा चित्रपटही त्या दरम्यानच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाकांक्षी चित्रपटांमध्ये टक्कर होणार हे अटळ. त्यातही प्रेक्षकांची कोणाला पसंती मिळते हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं. मुख्य म्हणजे दोन तगड्या व्यक्तीमत्वांच्या कलागुणांती ताकद पाहता आता कोणा एकाच्या माघार घेण्यानेच हा संघर्ष टळेल. तेव्हा आता माधार कोण घेणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं.