साराचं दुपारचं जेवण पाहून तुम्हालाही धक्का बसेल...

तिची अनेकांनीच प्रशंसा केली आहे.... 

Updated: Oct 13, 2019, 11:25 AM IST
साराचं दुपारचं जेवण पाहून तुम्हालाही धक्का बसेल...  title=

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींची प्रत्येक पोस्ट ही चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरते. अभिनेता वरुण धवन याने सोशल मीडियावर असाच एक फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याच्या एका पोस्टची चर्चा होण्याचं कारण आहे, एक अभिनेत्री. 

वरुण सध्या 'कुली नंबर १' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सैफ अली खानची मुलगी, नवोदित बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत तो या चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. सारासोबत स्क्रीन शेअर करणारा वरुण नेहमीच या चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट करत असतो. यावेळीही त्याने असाच एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये साराच्या जेवणाचं ताट नेमकं कसं असतं याचा फोटो त्याने पोस्ट केला. 'लंच', असं लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला. त्याने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जेवणाचं प्रमाण पाहून पाहताक्षणीच धक्का बसत आहे. अगदी कमी प्रमाणातील हे पदार्थ पाहून खाण्याच्या सवयींवर साराने किती ताबा ठेवला आहे, हे लक्षात येत आहे. 

खाण्याच्या सवयी आणि शारीरिक सुदृढतेविषयी सारा किती सजग आहे, हे तिने वारंवार विविध मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं आहे. व्यायाम, योगसाधना अशा विविध सवयी जोपासण्यासही तिचा बराच कल असतो. याचं उत्तम उदाहरण वरुणच्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. 

'केदारनाथ' या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या सारा अली खान हिने फार कमी वेळात तिचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. तेव्हापासूनच तिच्या चित्रपटांची निवड आणि अभिनय कलेची प्रशंसा सुरु झाली. सध्याच्या घडीला नवोदित आणि बहुचर्चित अभिनेत्रींमध्येही साराचं नाव गणलं जातं.