मुंबई : संगीत... अनेकांच्याच जिव्हाळ्याचा विषय. कोणासाठी हे एकटेपणाच्या वेळी साथ देणारं साधन असतं. कोणासाठी ते खास व्यक्तीइतकं महत्त्वाचं असतं तर कोणासाठी ते मन:शांतीचा स्त्रोत असतं. असं हे संगीत एखाद्या आजारी व्यक्तीसाठी तर अनेकदा वरदानही ठरतं.
अगदी बरोबर वाचलत तुम्ही. आजारपणात मन आणि शरीर यांची सुरु असणारी घालमेल आणि त्यामुळे एकंदरच निर्माण होणारी परिस्थिती या साऱ्यात समतोल राखत आजूबाजूला सकारात्मक लहरी निर्माण करण्यासाठी संगीताचं माध्यम हे कधीही सर्वोत्तम ठरतं.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचंही हेच म्हणणं आहे.
कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशात असणाऱ्या सोनालीची सोशल मीडिया पोस्ट पाहता याचा प्रत्यय येत आहे.
कॅन्सरच्या वैद्यकीय उपचारांसोबतच सोनाली सध्या संगीताच्या माध्यमातून मन:शांतीला प्राधान्य देताना दिसत आहे. नुकतच तिने सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सोशल मीडियावर याच कार्यक्रमातील एक फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, 'आपल्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेसाठी संगीताहून दुसरं उत्तम साधन नाही.'
सोनालीने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्या नजरेत असणारी चमक पाहता, खरंच संगीतात किती ताकद आहे, याची अनुभूती होतेय. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये कलाकारांसोबत वावरताना तिच्या चेहऱ्यारवर असणारा आनंदही बरंच काही सांगून जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरचं निदान झाल्याचं सोनालीने जाहीर केलं होतं.
ज्यानंतर ती उपचारांसाठी परदेशात रवाना झाली. सोनाली सध्याच्या घडीला परदेशात असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
उपचार पद्धतींची माहिती असो किंवा मग एखाद्या सणाच्या शुभेच्या, प्रत्येक वेळी ती एखादी पोस्ट करत चाहत्याच्या आणि आप्तजनांच्या चेहऱ्यावर हसू आणते हे खरं.