मुंबई: #MeToo चीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कलाविश्वात सुरु आहे. कलाविश्वात होणार लैंगिक शोषण आणि अत्याचाराचे अनुभव, कटू आठवणी अनेक अभिनेत्री आणि काही अभिनेत्यांनीही सर्वांसमोर ठेवला. मुख्य म्णणजे आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रात काही बड्या प्रस्थांची नावंही समोर आली.
अभिनेते नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे अनेकांना धक्काच बसला होता. यातच आता अभिनेत्री रिचा चड्ढानेही तिच्यासोबत घडलेल्या अशाच एका प्रसंगाचं कथन केलं आहे.
'गँग्स ऑफ वासेपूर', 'फुकरे', 'मसान' या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रिचाने लैंगिक शोषण हे सर्वच ठिकाणी होतं, असं म्हणत आपणही याचा सामना केला असल्याचं सांगितलं.
एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान तिला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. ज्यावेळी रिचाने हाय वेस्ट पॅट घातली होती. पण, नृत्यदिग्दर्शकाने तिची बेंबी दिसायला हवी म्हणून तिला जीन्स कमरेखाली घेण्यास सांगितलं होतं.
नृत्यदिग्दर्शकाची ही मागणी ऐकून तिला धक्काच बसला. ‘गाण्याचा सराव सुरु असतेवेळी मी हाय वेस्ट जीन्स घातली होती. ज्यामुळे माझी बेंबी दिसत नव्हती. हे त्या नृत्यदिग्दर्शकाने मला जीन्स कमरे खाली घेण्याचा सल्ला दिला. कोरिओग्राफरचा हा सल्ला ऐकून मी भांबावलेच. पण, पुढच्याच क्षणाला आपण काही एक करणार नसल्याचं स्पष्ट केलं’, असं रिचाने सांगितलं.
बेंबीच दिसावी असं तुम्हाला वाटत असल्यास मी चेहऱ्यावर, कपाळावर तसं चित्र काढते, त्यालाच माझी बेंबी समजा, असे खडे बोल तिने सुनावले.
आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाव्यतिरिक्त इतर कधीच कोणत्याही वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला नव्हता, असं तिने स्पष्ट केलं.
अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली मतं मांडणारी रिचा सध्या 'शकीला' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य अडल्ट स्टार शकीला यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याला अनेकांची पसंतीही मिळाली आहे.