मुंबई : संपूर्ण कलाविश्वात गेल्या बऱ्याच दिवसांपासून लग्नसराईचे वारे वाहात आहेत. यंदाचं वर्षच लग्नसराईचं वर्ष होतं, असं म्हणायला हरकत नाही. सोनम कपूर, नेहा धुपिया, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग अशा सेलिब्रिटींनी विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. त्यातच आता 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश झाला आहे.
अमेरिकन गायक निक जोनास याला डेट केल्यानंतर अखेर प्रियांकाने त्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वीच जोधपूर येथील उमेदभवन पॅलेसमध्ये मोठ्या थाटात या दोघांनी लग्नगाठ बांधली.
ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींनी निक-प्रियांका विवाहबद्ध झाले. या दोन्ही विवाहसमारंभांच्या वेळी त्याच्या लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नासाठी दोघांनीही राल्फ लॉरेनच्या डिझायनर वेअरला पसंती दिली. तर हिंदू विवाहसोहळ्यासाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याच्या डिझाईनला प्राधान्य दिलं.
लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये प्रियांका आणि सुरेख अशा शेरवानीमध्ये निक एकमेकांना शोभून दिसत होते. संपूर्ण लाल रंगाच्याच लेहंग्यामध्ये 'देसी गर्ल'चं सौंदर्य खुलून आलं होतं.
सब्यसाचीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा हा लेहंगा नेमका कसा साकारला याविषयीची रंजक माहिती दिली आहे. सब्यसाची हा त्याच्या डिझाईन्समध्ये असणाऱ्या कलाकुसरीसाठी आणि विविध कलांची सांगड घालत साकारलेल्या अफलातून लेहंगा आणि शेरवानीसाठी ओळखला जातो.
प्रियांकाच्या लेहंग्यासाठीही त्याने विशेष मेहनत घेतल्याचं ही पोस्ट पाहून लक्षात येत आहे. एम्ब्रॉयडरी आणि हँड कट फुलांच्या सहाय्याने त्याने हा लेहंगा आणखी उठावदार केला आहे. सिल्क फ्लॉसमध्ये फ्रेंच नॉट साकारण्यात आल्या आहेत.
कोलकात्याच्या जवळपास ११० कारागिरांनी या लेहंग्यावर असणारी एम्ब्रॉयडरी साकारली आहे. मुघल ज्वेलरीची जोड देत अधिक उठावदार करण्यात आलेला हा लेहंगा साकारण्यासाठी तब्बल ३७२० तास लागले आहेत.
प्रियांकाच्या लेहंग्यासोबतच त्यावर साजेसे दागिनेही तिला देण्यात आले. तर, निकच्या लूकवरही सब्यसाचीने विशेष काम केलं. सिल्कच्या सुरेख अशा शेरवानीसोबत त्याला चिकनकारी आणि चंदेरी टिश्यू साफाच्या शोभिवंत ओढणीची जोड देण्यात आली. त्याचा लूक पूर्ण करण्यासाठी डोक्यावर मानाचा फेटाही बांधण्यात आला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या जोडीचा थाट अनोखाच होता, असं म्हणायला हरकत नाही.