मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कसौटी जिंदगी की' अशा मालिकांतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि त्यांच्या मनातही स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री हिना खान हिने यंदा 'कान' चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. 'कान'च्या रेड कार्पेटवर येण्याचं हिनाचं हे पहिलं वर्ष. पण, तरीही ती ज्या आत्मविश्वासाने या रेड कार्पेटवर आली ते पाहता हिनाचं अनेकांनीच कौतुक केलं.
अतिशय मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात हिनाच्या जाण्याने भारतीय टेलिव्हिजन विश्वातही आनंदाची लाट पाहायला मिळाली. या अत्यंत नवख्या विश्वात तिची एका खास व्यक्तीशीही भेट घडली. ती खास व्यक्तीही एका अर्थी आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. प्रियांकाने या सोहळ्यादरम्यान हिनाला आपण या साऱ्यात नवखं असल्याच्या भावनेपासून दूर नेत तिला त्या ठिकाणी सहजतेनं वावरण्याचं पाठबळ दिलं.
प्रियांका येईपर्यंत एखादी बाहेरची व्यक्ती म्हणून आपल्यावर दडपण होतं, असं लिहित हिनाने प्रियांकाने कशा प्रकारे तिची या कार्यक्रमादरम्यान साथ दिली याविषयी सांगितलं. आपल्यासोबतच्या सर्व व्यक्तींना पुढे नेत, त्यांना मदत करत सर्वांच्या साथीने पुढे जाण्याच्या प्रियांकाच्या वृत्तीचं हिनाने कौतुक केलं. इतरांशी ओळख करुन देणं असो किंवा मग करिअरमधील लहानमोठ्या यशाविषयी इतरांना माहिती देणं असो, प्रियांकाने हिनाचा त्या गर्दीतही तिचं वेगळेपणं अतिशय मानाने सर्वांसमोर ठेवण्याची ताकद दिली. तिचेच आभार मानत हिनाने प्रियांका आणि निकसोबतचे काही फोटो पोस्ट करत त्यासोबत एक भावूक कॅप्शनही लिहिलं.
हिनाचा हा अंदाज आणि तिच्या भावना पाहता देसी गर्ल प्रियांकानेही तिचं कौतुक केलं. हिनाने संपादन केलेल्या यशाविषयी इतरांना सांगणं आणि त्या निमित्ताने भारतीय कलाविश्वाविषयी इतरांना माहिती देण्यात आपलं भाग्य असल्याचं म्हणत हिनासोबत वेळ व्यतीत करण्याचा आनंदही तिने व्यक्त केला. या दोन्ही अभिनेत्रींची पोस्ट पाहता यंदाच्या 'कान २०१९'च्या निमित्ताने प्रियांका आणि हिना असं एक नवं मैत्रीचं प्रेरणादायी नातं पाहायला मिळालं हेही तितकंच खरं.