मुंबई: अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अभिनेता अंगद बेदी सध्या फारच आनंदात आहेत. त्यांच्या आनंदामागचं कारणही तसंच आहे. नेहा आणि अंगद येत्या काळात त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. त्यासाठीच त्यांनी मुंबईच्या ऑलिव्ह बार अँड किचन येथे रविवारी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
नेहाच्या बेबी शॉवरच्या निमित्तासने आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीला तिच्या बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनीही हजेरी लावली होती.
बेबी शॉवरच्या निमित्ताने नेहाने सुरेख असा पांढऱ्या रंगाचा गुडघ्यापर्यंत उंची असणारा एक गाऊन घातला होता. डोक्यावर अगदी नाजुक असा टियारा घालून ती एखाद्या परीप्रमाणेच दिसत होती. तर, अंगदही तिला शोभून दिसत होता.
नेहा आणि अंगदला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी करण जोहर, सोहा अली खान, कुणाल खेमू, प्रिती झिंटा, इलियाना डिक्रूझ, अँड्र्यू निबोन यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
काही महिन्यांपूर्वीच नेहा आणि अंगदने लग्नगाठ बांधत सर्वांनाच थक्क केलं होतं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी सहजीवनाची शपथ घेतली होती.
आपल्या वैवाहिक नात्याची सुरुवात करणारी हीच जोडी आता पालकत्वाची जबाबदारी घेण्यासठीही तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.
येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी अत्यंत खास असून, येत्या काळात नेहा आणि आपल्या होणाऱ्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देणार असल्याचं अंगदने स्पष्ट केलं आहे.