मुंबई : सेलिब्रिटींचं आयुष्य जितकं हेवा वाटण्याजोगं भासतं, प्रत्यक्षात मात्र ते तसं नसतं. सेलिब्रिटींनाही काही अडचणींचा, आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. बरं, या साऱ्यातून सावरावंही लागतं.
हिंदी कला विश्वात 90 च्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आणि अभिनेता शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीकडे पाहूनही याचा अंदाज येत आहे.
ही अभिनेत्री आहे, महिमा चौधरी. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये महिमानं तिला स्तनांच्या कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती दिली. उपचार पद्धतीतून पुढे आलेली महिमा कोणा एका सुपरहिरोहून कमी नाही, असं खुद्द अनुपम खेरही म्हणाले. (Bollywood Actress mahima chaudhary breast cancer dedliest accindent facial injuries)
कर्करोगाच्या आजारानं खचण्यापूर्वी महिमा अशाच एका प्रसंगाला सामोरी गेली होती. एका अपघातामुळं मी शारीरिक आणि मानसिकरित्या कोसळले होते, असं खुद्द महिमानंच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
1999 मध्ये 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या निमित्तानं ती बंगळुरूमध्ये होती.
एके दिवशी चित्रीकरणासाठी जात असताना तिच्या कारला धडक बसली. धडक इतकी मोठी होती, की कारच्या काचा तुटून तिच्या चेहऱ्याला इजा पोहोचली. त्यावेळी महिमाची अवस्था गंभीर होती.
घटनास्थळावरून तिला कोणीच रुग्णालयातही न्यायला तयार नव्हतं. अखेर ती कशीबशी रुग्णालयात पोहोचली. ज्यानंतर आई आणि अभिनेता अजय देवगन तिची भेट घेण्यासाठी पोहोचले.
अपघातानंतर पहिल्यांदाच तिनं चेहरा आरशात पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. चेहऱ्यावर तिला फक्त टाकेच टाके दिसत होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत तिच्या चेहऱ्यातून 67 काचा बाहेर काढल्या होत्या.
हा अपघात आणि त्याची तीव्रता इतकी मोठी होती, की महिमाला स्वत:ची बरीच काळजी घ्यावी लागली. अनेक महिने तिला सूर्यप्रकाशात येण्याची परवानगी नव्हती. परिणाम तिच्या खोलीत कायमच अंधार असायचा.
सूर्यप्रकाशासोबतच युवी किरणं चेहऱ्यावर पडून त्यामुळं चेहऱ्यावरील व्रण दिसेनासे होण्यात अडचणी येतील यासाठीच हा सल्ला तिला देण्यात आला होता. बऱ्याच दिवसांसाठी तिनं स्वत:चा चेहराही पाहिला नव्हता.
ही घटना घडली तेव्हा तिच्याकडे बऱ्याच चित्रपटांची ऑफर होती. पण, अपघातामुळं ती या चित्रपटांना मुकली. चेहऱाच बिघडल्यामुळं अनेकांनीच आपला मोर्चा इतर अभिनेत्रींकडे वळवला होता.
एका अभिनेत्रीसाठी तिचं सौंदर्य प्रचंड महत्त्वाचं असतं. पण, त्याच सौंदर्यावर जखमांचे व्रण आवे आणि महिमाच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं.