नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister narendra modi यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक स्तरांतून, शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. देशात सानथोरांपासून अनेकांनीच पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौतही मागे राहिलेली नाही.
ट्विटरच्या माध्यमातून kangana ranaut कंगनानं पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देत असताना पंतप्रधानांशी थेट भेट न झाल्याची खंतही बोलून दाखवली आहे. सोबतच इथंही तिचा स्पष्टवक्तेपणाच दिसून आला आहे.
व्हिडिच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिनं मोदींवर टीका करणाऱ्यांनाही लक्ष्य केलं आहे. 'माननीय पंतप्रधान मोदीजी तुम्हाला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी केव्हाच मिळाली नाही. हा देश तुमची फार प्रशंसा करतो. मला ठाऊक आहे, यामध्ये असेही काही आवाज आहेत, जितकं चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला वागणूक दिली जाते, कोणाचातरी इतका अपमान फार क्वचितच होत असेल. विशेष म्हणजे कोणा पंतप्रधानांनाविषयी कोणी इतके अभद्र शब्द बोलत असेल असं क्वतितच. पण, तुम्हीही जाणता की ही फार कमी लोकं आहेत. एका सर्वसामान्य भारतीयाच्या मनात तुमच्याप्रती जी भावना आहे ते पाहता मला नाही वाटत की इतका आदर, इतकं प्रेम कोणा एका पंतप्रधानांना आतापर्यंत मिळालं आहे. जे कोट्यवधी भारतीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत तेसुद्धा तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. तुमच्यासारखे पंतप्रधान मिळणं हे आमचं भाग्यच आहे', असं कंगना म्हणाली.
#HappyBirthdayPMModi pic.twitter.com/bmyYFkeVMs
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 17, 2020
पंतप्रधानांना, तुमची निंदा करणाऱ्यांच्या तुलनेत समर्थन करणारे, पाठिंबा देणारेच जास्त आहेत असा संदेश देत शुभेच्छा देणाऱ्या कंगनाचा हा अंदाज सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. दरम्यान, अद्यापही कंगना विरुद्ध कलाविश्वातील प्रस्थापितांचा सुरु असणारा वाद काही मिटण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवशी या वादाचं एक नवं स्वरुप सर्वांसमोर येत आहे. त्यामुळं आता या वादावर नेमका पडदा कधी पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.