'घटस्फोटानंतर कुटुंबावर झालेले परिणाम निराशाजनक'

शेजारी त्यांना वारंवार विचारायचे की.... 

Updated: Oct 27, 2019, 04:41 PM IST
'घटस्फोटानंतर कुटुंबावर झालेले परिणाम निराशाजनक'  title=

मुंबई : कलाविश्वात कोणत्याची नात्याविषयी शाश्वती देता येत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. असं नेमकं का होतं याची अनेक उदाहरणंही आतापर्यंत पाहायला मिळाली आहेत. क्षणार्धात आकारास येणाऱ्या नात्यांना तडा जाण्यास अजिबात वेळ जात नाही, हे काही सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यावरुन पाहायला मिळालं आहे. मुळात नात्यात येणारा हा दुरावा फक्त अमुक एका सेलिब्रिटीवरच नव्हे, तर थेट त्यांच्या कुटुंबावरही परिणाम करुन जातो. 

अभिनेत्री कल्की केक्ला हिनेही अशा परिस्थितीचा सामना केला आहे. बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत कल्कीने २०११ मध्ये लग्न केलं होतं. पण, काही वर्षांतच त्यांच्या या नात्यात दुरावा आला. अखेर २०१५ मध्ये या दोघांनीही कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला कल्की तिच्या खासगी आयुष्यात बरीच पुढे आली असली तरीही काही गोष्टी मात्र तिला आजही सतावतात. एका मुलाखतीदरम्यानच तिने याबाबतची माहिती दिली. 

'प्रामाणिकपणे सांगावं तर, ते (घटस्फोटाचं) सारंकाही अतिशय निराशाजनक होतं. कारण, या साऱ्यामध्ये माझं कुटुंबसुद्धा होतं. त्यांच्यावरही या साऱ्याचे परिणाम झाले होते. बंगळुरूमध्ये असणारे लोक, पालकांच्या शेजारी राहणारे सर्वजण, हे (घटस्फोटाचं) खरं आहे का, असंच विचारत होते. कोणत्या परिने चर्चेसाठीच विषय मिळवण्याचाच त्यांचा प्रयत्न असायचा', असं कल्की म्हणाली. 

आपल्या घटस्फोटाविषयी पालकांना उत्तरं द्यावी लागत असल्याविषयी तिने निरासा व्यक्त केली. सोबतच अनुरागसोबतच्या नात्याविषयी आपण त्याच्याशी कायमच चर्चा केल्याचंही तिने या मुलाखतीत सांगितलं.