लग्नाच्या चर्चांमध्येच आलियाने सांगितला रणबीरसोबतचा अविस्मरणीय क्षण

ही सेलिब्रिटी जोडी येत्या काळाता लग्नाच्या  बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Updated: Oct 28, 2019, 12:56 PM IST
लग्नाच्या चर्चांमध्येच आलियाने सांगितला रणबीरसोबतचा अविस्मरणीय क्षण  title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे त्यांच्या नात्याविषयी अनेकदा चर्चेत असतात. मुख्य म्हणजे गेल्या बऱ्याच काळापासून या दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी मोकळेपणाने बोलण्यास प्राधान्य दिलं आहे. पुरस्कार सोहळ्यापासून सेलिब्रिटी पार्टीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचं एकत्र येणं चाहत्यांची मनं जिंकून जातं. अशाच या काही खास क्षणांच्या आठवणी आलिया तिच्या मनात जपून ठेवत आहे.

आठवणींच्या याच गाठोड्यातील एका क्षणाचा तिने सर्वांसमक्ष उलगडाही केला. युट्यूबवर चाहत्यांच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आलियाने त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सर्वांसमोर आणल्या. 

प्रश्नोत्तरांच्या याच सत्रात आलियाला एका असा प्रश्न विचारला गेला ज्याचं उत्तर देत तिने थेट रणबीरसोबतच्या एका क्षणाची आठवण सांगितली. २०१९ हे वर्ष आता अखेरच्या टप्प्यात आहे. तेव्हा आतापर्यंत या वर्षातील तुझा अविस्मरणीय क्षण कोणता, असं तिला विचारण्यात आलं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर देत आलियाने फिल्मफेअर पुरस्कार मिळण्याचे क्षण पुन्हा जागवले. 'माझ्यासाठी खास क्षण म्हणाल तर, तो क्षण जेव्हा मला (यंदा) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तेव्हा रणबीरलाही पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी व्यासपीठावर आम्ही असताना आमचे फोटो काढले जाणं..... हे सारंकाही सुरेख होतं', असं आलिया म्हणाली. 

एकमेकांच्या कामाची प्रशंसा करत कलाविश्वात पुढे जाण्यासाठीसुद्धा एकमेकांची साथ देणारे रणबीर आणि आलिया हे चाहत्यांना खऱ्या अर्थाने कपल गोल्स देत आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.