Adah Sharma on buying Sushant Rajput House : 'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अदा शर्माला ओळखले जाते. अदा शर्माला या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील अदा शर्माच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. अदा शर्मा ही चित्रपटांसह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. तिचे या घराबाहेरील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अदाने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं 14 जून 2020 रोजी निधन झालं होतं. सुशांतने मुंबईतील वांद्रे परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनानंतर गेल्या चार वर्षांपासून हा फ्लॅट बंद आहे. हा फ्लॅट विकत घेण्यास कोणीही तयार नव्हते. तसेच हा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत होते. पण गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने हा फ्लॅट विकत घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अदा शर्मा ही सुशांत सिंहच्या वांद्र्यातील घराच्या परिसरात दिसली होती. त्यामुळे अदा ही ते घर खरेदी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर अदाला अनेकदा मुलाखतीदरम्यान सुशांत सिंहचे घर विकत घेण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. पण तिने यावर कधीही भाष्य केले नव्हते. अखेर आता एका मुलाखतीत अदाने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
अदा शर्माने नुकतंच सिद्धार्थ कन्ननला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अदा शर्माने सुशांतच्या त्या घराबद्दल वक्तव्य केले. "मी आता तुम्हाला इतकंच सांगू शकते की सध्या तरी मी लोकांच्या हृदयात राहते. प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक योग्य वेळ असते. मी जेव्हा ते ठिकाण पाहायला गेले, त्यावेळी मला मीडियाकडून जी प्रसिद्धी मिळाली ती फारच उल्लेखनीय बाब होती. ते पाहून मला खूपच आनंद झाला होता. मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना सांगते. तसेच मी माझ्या गोपनीयतेचीही काळजी घेते", असे अदा शर्मा म्हणाली.
दरम्यान अदा शर्मा ही गेल्या 16 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 1920 हा तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर ती अनेक चित्रपटात झळकली. पण तिचे हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटाने जगभरात 350 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. सध्या ती ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ या चित्रपटात झळकत आहे.