सलमानच्या 'त्या' अंगरक्षकाचा भर रस्त्यात धुडगूस

कारच्या काचाही फोडल्या

Updated: Sep 26, 2019, 05:10 PM IST
सलमानच्या 'त्या' अंगरक्षकाचा भर रस्त्यात धुडगूस  title=
सलमानच्या 'त्या' अंगरक्षकाचा भर रस्त्यात धुडगूस

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अंगरक्षकांच्या चमूत एकेकाळी काम करणाऱ्यांपैकी एकाने भर रस्त्यात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. अनिस कुरेशी असं त्याचं नाव आहे. मुरादाबाद येथे भर रस्त्यात त्याने तणावाची परिस्थिती निर्माण केल्याचं म्हटलं जात आहे. त्याने जवळपास दीड वर्षासाठी सलमानचा अंगरक्षक म्हणून काम पाहिलं होतं. 

बुधवारी रात्री व्यायामशाळेत जाण्यापूर्वी त्याने जास्त औषधं घेतल्याचं म्हटलं जात आहे. जेणेकरुन व्यायाम करतेवेळी तो जास्त वजन (भार) उचलू शकेल. जास्त वजन उचलण्याकरता गरजेची असणारी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठीच त्याने असं केलं होतं. पण, या औषधांचा चुकीचा परिणाम झाला आणि अनसने रस्त्यातच धुडगूस घातला. 

गुरुवारी सकाळी त्याची ही परिस्थिती आणखी बिघडली. परिणामी त्याने रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता त्याने एका लोखंडी रॉडच्या सहाय्याने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कारच्या काचाही फोडल्या. ही सारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहातच प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना याविषयीची माहिती देत मदत मागितली. 

पोलीस आल्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या सहाय्याने मासेमारांचं जाळं आणि दोरखंडाच्या मदतीने अनसला पकडण्याचा प्रयत्न केला.  ज्यानंतर त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मानसिक स्वास्थ्य गंभीर... 

रुग्णालयात नेलं असता त्याला बरेली येथील मनोरुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यायामशाळेत जाण्यापूर्वी अनसने घेतलेल्या औषधांचं प्रमाण चुकलं आणि ती अधिक प्रमाणात घेतली गेल्यामुळे ही परिस्थिती उदभवली. 

गेल्या दहा दिवसांपासून अनस मुरादाबादमध्ये आहे. नुकतंच त्याने मि. मुरादाबाद या स्पर्धेतही सहभाग घेतला होता. सध्याच्या घडीला तो महाराष्ट्राच्या एका मंत्रीमहोदयांचा अंगरक्षक म्हणून काम पाहत आहे.