प्रदर्शनाच्याच दिवसापासून 'भारत'पुढे उभ्या राहणार अडचणी

ही अडचण म्हणण्यापेक्षा चित्रपटापुढी आव्हान आहे असंच म्हणावं लागेल

Updated: Apr 30, 2019, 08:54 PM IST
प्रदर्शनाच्याच दिवसापासून 'भारत'पुढे उभ्या राहणार अडचणी title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात ईदच्या दिवशी सलमान खानचा एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणं हे काही नवं नाही. मुख्य म्हणजे दरवर्षी चाहते सलमानचा एखादा चित्रपट कधी आपल्या भेटीला येतो याची वाटत पाहात असतात. यंदाही भाईजान सलमान त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे तोही एका अफलातून चित्रपटाच्या माध्यमातून. हा चित्रपट म्हणजे 'भारत'. प्रदर्शनापूर्वीच चर्चेच असणारा हा चित्रपट एकिकडे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे. पण, त्याच्यापुढे असणारी आव्हानंही कमी नाहीत. 

५ जूनला सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱा 'भारत' प्रदर्शित होतोय खरा. पण, त्याच वेळी आयसीसी विश्वचषकाचे सामनेही सुरू असणार आहेत. मुख्य म्हणजे चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार आहे, त्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी आहे. त्यामुळे आता प्रेक्षक आणि क्रीडा रसिकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाचे पडसाद आता चित्रपटाच्या कमाईवर कितपत पडतात हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 

क्रिकेट सामन्यांचा फटका बॉलिवूड चित्रपटांना बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएल सामन्यांच्या दरम्यानही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यातही ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकामुळे क्रिकेट सामन्यांकडेच अनेकांचा कल असेल. त्यामुळे आता या साऱ्याची गणितं मांडण्यास सुरुवात झाली आहे. 

सलमानचा हा आगामी चित्रपट मुळचा दक्षिण कोरियन चित्रपट ओड टू माय फादरचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिशा पटानीसुद्धा झळकणार असून, सलमानची विविध रुपं चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यामधून चित्रपटाच्या कथानकाची झलक पाहायला मिळाली होती. ऍक्शनपासून, संवादांपर्यंत अनेक बाबतीत चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे दबंग खानचा हा भारत बॉक्स ऑफिसवर काही विक्रम रचण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.