रितेशने शेअर केलेला बिग बींचा ३७ वर्षे जुना भावनिक व्हिडिओ पाहाच

मृत्यूच्या दाढेतून अमिताभ बच्चन परतले होते. 

Updated: Sep 26, 2019, 11:32 AM IST
रितेशने शेअर केलेला बिग बींचा ३७ वर्षे जुना भावनिक व्हिडिओ पाहाच  title=
रितेशने शेअर केलेला बिग बींचा ३७ वर्षे जुना भावनिक व्हिडिओ पाहाच

मुंबई : व्हॉट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्राम  आणि अशा इतरही अनेक माध्यमांना हल्ली सोशल मीडिया असं सर्वसमावेशक नाव देण्यात आलं आहे. या माध्यमातून दररोज असंख्य व्हिडिओ, फोटो, मीम्स, संदेश सारंकाशी शेअर केलं जातं. कित्येकदा यातील काही व्हायरल व्हिडिओंकडे अनेकांचं लक्षही जात नाही. पण, काही व्हिडिओ याला अपवादही ठरतात. बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख याने असाच एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.  

रितेशने शेअर केलेला हा व्हिडिओ फार खास आहे, कारण तो व्हिडिओ आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या माहानायक अभिनेत्याचा. म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा. जवळपास ३७ वर्षे जुना असा हा व्हिडिओ शेअर करत रितेशने प्रेक्षकांपुढे बिग बींच्या कारकिर्दीत आलेला एक असा प्रसंग समोर आणला आहे, ज्यावेळी साऱ्या देशाने अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. त्यामागे कारणंही तसंच होतं. 

'कुली' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बिग बींना एका हाणामारीच्या दृश्यादरयम्यान अनावधानाने सहअभिनेत्याचा जोरदार ठोसा पोटात लागल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पुनीत इस्सर हे त्या दृश्यात बिग बींसोबत झळकणार होते. त्यांनी मारलेला ठोसा इतका जोरदार होता, की बच्चन यांच्या आतड्यांना दुखापत झाली होती. परिणामी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती बरीच चिंताजनक होती. 

अतिशय कठीण अशा या प्रसंगाचा सामना केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी अमिताभ बच्चन जेव्हा त्यांच्या घरी परतण्यासाठी निघाले तेव्हाचाच हा दूरदर्शनचा व्हिडिओ रितेशने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बच्चन स्वत: त्यांच्या प्रकृतीविषयी बोलत आहेत. यामध्ये त्यांनी आपल्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचे मनापासून आभार मानले होते. 'माझ्या दीर्घायुष्यासाठी मंदीर, मशिद आणि चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या असंखजणांचा मी आभारी आहे', असं ते म्हणाले. आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांपैकी अनेकांना तर मी ओळखतही नाही. पण, आता यापुढे मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचाच प्रयत्न करेन, असा विश्वास अमिताभ यांनी व्यक्य केला होता. 

एक कलाकार म्हणून बिग बींच्या लोकप्रियतेचा अंदाज ३७ वर्षांपूर्वीही अनेकांनी पाहिला. ते रुग्णालयातून परतले तेव्हा अनेक चाहत्यांना अश्रूही आवरणं अशक्य झालं होतं. अशा या कलाकाराने आजवर चित्रपट वर्तुळात कमालीची कामगिरी करत एक मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. बच्चन यांच्या याच योगदानासाठी नुकताच त्यांच्या नावे दादासाहेब फाळके या मानाच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.