मुंबई : असं म्हणतात आयुष्यातील सर्वच दिवस एकसारखे नसतात. एका अतिशय गाजलेल्या बॉलिवूड अभिनेयासोबतही असंच घडलं. ज्यानं सुरुवात तर केली प्रॉडक्शन आणि वेशभूषेपासून सुरुवात केली होती. पण, आज मात्र हा अभिनेता त्याच्या अभिनयाच्या बळावर इतका पुढे गेला आहे, की विचारून सोय नाही.
मुख्य भूमिका हाताशी नसतानाही सहाय्यक भूमिकेमध्ये जीव ओतून ती तोडीस तोड अशीच साकारणारा हा अभिनेता गरिबीच्या दिवसांतून वर आला. ‘नुक्कड’ या अतिशय गाजलेल्या टीव्ही सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्याचं नाव आहे, पवन मल्होत्रा. (Pavan malhotra)
'पैसा कमाने के लिए भी पैसे होने की जरूरत होती है', हा डायलॉग पवन मल्होत्राच्याच 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटातील आहे. किंबहुना हा डायलॉग त्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही लागू होतो.
कारण, पवन जेव्हा मुंबईत आला होता, त्यावेळी त्याच्याकडे पोटापुरतेसुद्धा पैसे नव्हते. ब्रेड- पाव विकण्यापासून गाईंना चारा खाऊ घालण्यापर्यंतची कामं त्यानं केली. झगमगणाऱ्या या शहरानं पवनला आसराही दिला आणि मोठं होण्यासाठीचं बळंही त्याच्या स्वप्नांना दिलं.
शालेय दिवसांपासूनच त्याला अभिनयामध्ये विशेष आवड होती. पण, आपल्याला मुलानं कौटुंबिक व्यवसायात हातभार लावावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. याच इच्छेखातर एके दिवशी वडिलांनी पवनला अभिनय सोडून व्यवसायात लक्ष घालण्यास सांगितलं.
अभिनयाच्या वाटा बंद झाल्या. पण, आताच त्याच्या आयुष्याला खरं वळण मिळणार होतं. कारण, एके दिवशी ‘गांधी’ चित्रपटाती प्रॉड्शन टीममधील एक व्यक्ती पवनच्याच दुकानात स्पिरीट खरेदीसाठी आला होता. पुढे या चित्रपटासाठी वेशभूषा विभागात एका सहायकाची आवश्यकता असल्याची बातमी त्याच्या कानावर आली.
अखेर पवन ‘गांधी’ चित्रपटामध्ये वॉर्डरोब असिस्टंट झाला. यासाठी त्याला 350 रुपये रोज, असा पगार मिळू लागला.
पुढे त्यांनी मुंबईची वाट धरली. इथं त्यांना 'ये जो है जिंदगी'मध्ये असिस्ट करण्याची संधी मिळाली. पण, पगार इतका कमी होता की राहणं दूर, खाण्याचीही आबाळ झाली. पण, त्यानं एक छदामही कोणाकडे उसना मागितला नाही.
कधी ब्रेड विकणं, कधी गाईंना चारा खायला घालण्याचं काम करणं अशी कामं शोधत त्यांनी या शहरात तग धरला. पण, कधीच कोणापुढे अगदी स्वत:च्या वडिलांपुढेही हात पसरले नाहीत. या अभिनेत्याच्या वाट्याला अपयश आलंच नाही असं नाही.
अपयशाची आणि त्याची तर खास गट्टी. म्हणून की काय काही चांगलं घडण्याचे संकेत मिळताच कुठेतरी घोळ होत होता. पवन पाहता पाहता या कलाविश्वास रुळला, रमला आणि त्यानं स्वबळावर पवन मल्होत्रा, नावाचं स्वत:चं साम्राज्य निर्माण केलं.