अभिनेते इरफान खान काळाच्या पडद्याआड

वयाच्या 54व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

Updated: Apr 29, 2020, 01:55 PM IST
अभिनेते इरफान खान काळाच्या पडद्याआड title=

मुंबई : वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक आणि कमालीच्या सहज अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान याचे बुधवारी मुंबईत निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वीच इरफान खानच्या आईचे निधन झाले होते. यानंतर सातत्याने इरफानच्या प्रकृतीविषयी अफवा ऐकायला मिळत होत्या. मात्र, आज इरफानच्या पीआर टीमकडून त्याच्या निधनाची बातमी देण्यात आली. इरफान खानच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्या अभियनाने प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांची वाहवा मिळवणाऱ्या इरफान खानला २०१८ मध्ये हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर, कर्करोग असल्याचे निदान झाले होते. मध्यंतरीच्या काळात इरफान खान याने परदेशात जाऊन उपचार घेतले होते. काही दिवसांपूर्वीच इरफान खान मुंबईत परतला होता. मात्र, २८ एप्रिलला प्रकृती खालावल्यामुळे इरफान खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इरफान खानवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, इरफानचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर आज इरफान खानने अखेरचा श्वास घेतला. 

७ जानेवारी १९६६ रोजी जयपूर येथे इरफान खानचा जन्म झाला होता. एम.ए. चे शिक्षण सुरु असताना इरफान खानला राष्ट्रीय कला अकादमी (NSD) शिष्यवृत्ती मिळाली. एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर इरफान खान मुंबईत आला. यानंतर इरफान खानने 'चाणक्य', 'भारत एक खोज', 'बनेगी अपनी बात', 'चंद्रकांता', 'स्टार बेस्टसेलर' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.

१९८८ साली मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे या चित्रपटातून इरफान खान याने हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. मात्र, इरफानला व्यावसायिकदृष्ट्या यश मिळण्यासाठी २००१ साल उजडावे लागले. आसिफ कपाडिया यांच्या 'वॉरियर' चित्रपटातील प्रमुख भूमिकेमुळे इरफान खान प्रकाशझोतात आला. यानंतर 'हासिल', 'मकबूल', 'लाईफ इन मेट्रो', 'पानसिंह तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'पिकू', 'तलवार' या चित्रपटांतून प्रेक्षकांना इरफान खानचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळाला. 

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर इरफान खानने हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या हिंदी कलाकारांच्या पंक्तीतही स्थान मिळवले. 'द नेमसेक', 'द दार्जलिंग लिमिटेड', 'स्लमडॉग मिलेनिअर', 'लाइफ ऑफ पाय', 'द ज्युरासिक पार्क' या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केले.

इरफान खानने आपल्या कारकीर्दीत ५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. इरफानला त्याच्या अभिनयासाठी एकदा राष्ट्रीय पुरस्काराने तर चार वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. कलाक्षेत्रातील योगदानासाठी इरफान खानला पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता. 'अंग्रजी मिडियम' हा इमरान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये इरफानच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊनमुळे इरफान त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकले नव्हते. त्यांनी व्हिडिओ कॉलवरुच आपल्या आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं.