मुंबई : बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळख असलेला सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून हृतिकवर शुभेच्छांचा वर्षांव होतोय. पण या सर्व शुभेच्छांमध्ये हृतिकच्या आईने त्याला दिलेल्या शुभेच्छा, त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सर्वाचंच लक्ष वेधत आहेत.
हिंदी कलाविश्वात अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देणाऱ्या हृतिकने त्याच्या आयुष्यात, करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हृतिकने त्याच्या आरोग्यासंबंधीही अनेक समस्यांचा सामना केला आहे. हृतिकच्या आईने, पिंकी रोशन (Pinkie Roshan) यांनी हृतिकच्या वाढदिवशी त्याच्या ब्रेन सर्जरीचे काही फोटो, एका भावनिक संदेशासह पोस्ट केले आहेत. हृतिकला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्यांना जवळपास चक्करच येत होती. पण हृतिकच्या एका नजरेने, त्याच्या हास्याने त्यांना ताकद मिळाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पिंकी रोशन यांनी लिहिलेली पोस्ट पाहून, हृतिकचे फोटो पाहून अनेक जण हृतिकच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. अशा कठीण प्रसंगातही हृतिकला दिलेल्या प्रोत्साहनासाठी चाहत्यांकडून पिंकी रोशन याचंही कौतुक होत आहे.