मुंबई : हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटींनी नाव कमवल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुटुंबातील व्यक्तीसुद्धा अभिनय क्षेत्राच्या या वाटेचे वाटसरु होऊ पाहतात. सेलिब्रिटींच्या मुलांनी चित्रपटांच्या या दुनियेत येणं हे मुळात कोणासाठी नवं नाही. पण, फक्त आई- वडिलांच्या प्रसिद्धिचा वापर करत आणि त्यांच्या नावाचा फायदा घेतच ही सेलिब्रिटींची मुलं पुढे येतात असा अनेकांचा समज असल्याच तो चुकीचा आहे.
कारण, संघर्ष, अपेक्षांचं ओझं हे सारं या नव्या पिढीलाही चुकलेलं नाही. नुकतंच अभिनेता चंकी पांडे याने त्यांची मुलगी अनन्या पांडे हिच्याविषयी आणि तिच्या वाट्याला आलेल्या नैराश्यग्रस्त परिस्थितीविषयी माहिती दिली.
'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या काही दिवसांपूर्वी अनन्याची नेमकी मनस्थिती कशी होती, याविषयी चंकीने उलगडा केला. 'मुंबई मिरर'शी संवाद साधत असताना त्याने याविषयी खुलेपणाने सांगितलं. ''अनेकदा ती जेव्हा घरी परतायची त्यावेळी मी तिच्या चेहऱ्यावर नैराश्य, तणाव पाहायचो. मी तिला याविषयी कधीच काही म्हणालो नाही. पण, जेव्हा मी तिच्या चित्रपटाचा 'ट्रायल शो' पाहिला, तेव्हा मात्र मी समजलो होतो की ही काहीतरी चांगलं नक्कीच करणार'', असं चंकी म्हणाला.
स्वत:च्या मुलीशी स्वत:ची तुलना केली जाण्य़ाच्या बाबतील चंकीने काही रंजक गोष्टीही सांगितल्या. 'मी फारच मस्तीखोर होतो. माझ्यासोबत मुलीची कधी तुलनाच होऊ शकत नाही. करिअरच्या सुरुवातीला मीसुद्धा एका वेगळ्याच प्रकारच्या दबावाखाली होतो. आई- वडील वैद्यकीय क्षेत्रातील असल्यामुळे माझ्याकडून अशा अपेक्षा होत्या', असंही तो म्हणाला.
चंकी पांडेची मुलगी म्हणजेच अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिचा हा चित्रपट बॉ़क्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. पण, तिच्या अबिनयाची मात्र प्रशंसा झाली. येत्या काळात अनन्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेली ती कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.