मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची सावत्र बहीण जान्हवी कपूर या दोघांनीही नुकतीच 'कॉफी विथ करण' या चॅट शोवर हजेरी लावली होती. करण जोहरसह या दोघांनीही सुरेख गप्पा मारत त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत आपल्यातील नातं सर्वांसमोर ठेवलं. याच कार्यक्रमातील एका खेळामध्ये जान्हवी कपूर हिने अंशुलाची मदत घेतली. पण, अंशुलाने तिला मदत न केल्यामुळे एका वेगळ्याच वादाने डोकं वर काढलं.
'कॉफी विथ करण' या चॅट शोदरम्यान एक खेळ खेळण्यात आला. ज्यामध्ये आपल्या कोणत्याही नातोवाईकाला फोन करुन त्या व्यक्तीकडून "Hey, Karan, What's up", असं म्हणवून घ्यायचं होतं. सर्वप्रथम जे कोणी फोन करण्यात आणि असं म्हणवून घेण्यात यशस्वी ठरणार त्यांच्या वाट्याला एक गुण जाणार असं एकंदर या खेळाचं स्वरुप होतं.
करणने सांगितलेल्या या हटके खेळासाठी जान्हवीने लगेचच आपली सावत्र बहीण अंशुला कपूर हिला फोन लावला. पण, अर्जुनने तिला काहीच न बोलण्यास सांगितलं. ज्यामुळे तिला काही समजेनासं झालं आणि ती काहीच बोलली नाही. तितक्यातच अर्जुनने बोनी कपूर यांना फोन केला आणि ते "Hey, Karan, What's up", असं म्हणाले ज्यामुळे अर्जुन हा खेळ जिंकला.
जान्हवी हरल्यामुळे काहीशी उदास झाली आणि जे तिच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळालं. हे सारंकाही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पण, चॅट शोचा हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर मात्र सोशल मीडियावर अनेकांनीच अंशुलावर निशाणा साधला होता. जान्हवीला मदत न केल्यामुळे अनेकांनीच तिच्यावर नाराजी व्यक्त केली.
तिला होणारा विरोध आणि नेटकऱ्यांनी शेलक्या शब्दांत केलेल्या टीका पाहता अखेर अर्जुन कपूरने सर्व ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी आता भान राखण्यात अर्थ नाही, असं म्हणत आपल्या बहिणीला वाईट शब्दांमध्ये विरोध करणाऱ्या आणि तिच्यावर निशाणा साधणाऱ्यांना अर्जुनने धारेवर धरलं.
Something I assumed was an absolute non issue on Koffee with Karan has escalated into @anshulakapoor being abused & I can’t be bothered by protocol anymore. F**k all those trolls who wish harm to my sister. I hope ur mom or sister never have to go thru what u have put us thru...
— Arjun Kapoor (@arjunk26) November 27, 2018
अर्जुन कपूर आणि त्याच्या सावत्र बहिणी यांच्यात असणारं नातं गेल्या काही दिवसांपासून अतिशय चांगल्या वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. पण, सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात प्रमाणाहून जास्त स्वारस्य असणाऱ्यांचा दृष्टीकोन मात्र अद्यापही बदलला नसून ते या साऱ्याक़डे आजही चुकीच्या नजरेतून पाहत असल्याचच स्पष्ट होत आहे.