मुंबई : स्वातंत्र्यानंतरही भारतामध्ये अनेक जात, धर्म, पंथाच्या मुद्यावरुन तणावाची परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळालं. याच्या झळा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या होत्या. याच संघर्षमय प्रसंगांमधील एक म्हणजे काश्मीरी पंडितांसोबत झालेली हिंसा. Kashmiri Pandits म्हणून मुळची ओळख असणाऱ्यांसोबत झालेल्या हिंसेला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९ जानेवारी १९८९मध्ये आपल्या हक्काच्या ठिकाणाहून दुरावलेल्या गेलेल्या काश्मिरी पंडितांना आजही त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावं लागत आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे त्याच काश्मिरी पंडितांपैकी एक. आपल्या समुदायाची झालेली अवहेलना पाहता त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. शिवाय आपल्याला न्याय मिळण्याची एक आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने समाजाला खडबडून जागं करणारा ठरत आहे.
३० वर्षांपूर्वी कशा प्रकारे काश्मिरी पंडितांना त्यांच्या वडिलोपार्जित घरांना आणि गावांना सो़डून शरणार्थी शिबीरांमध्ये जावं लागलं होतं, कशा प्रकारे होत्याचं नव्हतं होऊन अनेकांचे बळी गेले होते याचं चित्रच खेर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उभं केलं आहे.
'मी एक काश्मिरी पंडित आहे...', असं म्हणत खेर यांनी जवळपास चार वर्षांपूर्वी या व्हिड़िओचं चित्रीकरण केल्याचं स्पष्ट केलं. तेव्हापासून परिस्थिती काही बदललेली नाही, असं म्हणत ही कोणतीही काल्पनिक कथा नसून ३० वर्षांपूर्वी हे सारंकाही घडल्याचं वास्तव त्यांनी सर्वांपुढे ठेवलं. ज्या काश्मिरी पंडितांना एका रात्रीत आपलं अस्तित्विच सोडून निघावं लागलं त्यामध्ये आपलेही काही नातलग होते, असं म्हणत जे घडून गेलं ते किती हादरवणारं होतं हे जगाला कळलंच पाहिजे असा आर्जवी सूर खेर यांनी कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केला.