खुद्द अमिताभ बच्चनच मेकअप मॅनला सरप्राईज देतात तेव्हा....

आपल्या वागण्याबोलण्यातून बच्चन यांनी नेहमीच अनेकांना थक्क केलं आहे. 

Updated: Feb 1, 2020, 10:43 AM IST
खुद्द अमिताभ बच्चनच मेकअप मॅनला सरप्राईज देतात तेव्हा....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बिग बी, शहेनशहा, महानायक अशी बहुविध नावांनी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन Amitabh Bachchan म्हणजे जणू अभिनयाचं एक विद्यापीठच. नवख्या कलाकारांच्या आदर्शस्थानी असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी एक  कलाकार म्हणून कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. शिवाय याच प्रेक्षकांसाठी, समाजासाठी वेळ पडल्यास ते मार्गदर्शकही ठरले. आपल्या वागण्याबोलण्यातून बच्चन यांनी नेहमीच अनेकांना थक्क केलं आहे. त्यातच आता आणखी एक प्रसंग जोडला गेला आहे. 

कलाकारांसाठी त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींपैकी एक म्हणजे त्यांचे मेकअप आर्टीस्ट. बिग बींसाठीसुद्धा या एका व्यक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं लक्षात आलं. कारण, दीपक सावंत या मेकअप मॅनच्या सलूनममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बच्चन यांनी उपस्थिती लावत आपल्या या सहकाऱ्याला आश्चर्याचा धक्काच दिला. 

जवळपास गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ दीपक सावंत हे बिग बींच्या मेकअपसाठी त्यांच्यासोबत असतात. याच दीपक यांच्या सलूनला ४० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, बच्चन तेथे उपस्थित राहतील अशी पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. पण, ते आले आणि क्षणार्धातच वातावरणात वेगळाच हर्षोल्हास पाहायला मिळाला.

आपला हाच आनंद व्यक्त करत दीपक म्हणाले, 'मी त्यांना येताना पाहिलं तेव्हा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यांनी खऱ्या अर्थाने मला आयुष्यभरासाठीची एक खास भेटवस्तू दिली. मी आणि माझे कुटुंबीय हे कधीच विसरु शकणार नाही. किंबहुना आम्ही याहून जास्त कसली अपेक्षा करुच शकत नाही', असं म्हणत दीपक यांनी बच्चन यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

अमिताभ बच्चन यांनी कायमच मला त्यांच्या कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आहे. त्या साऱ्यांमुळेच मी आज इतका यशस्वी आहे, असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्यासोबत, आपल्यासाठी काम करणारे अनेक हात हे फार कसलीच अपेक्षा करत नाहीत. आपलेपणाची भावना आणि एक निखळ नातंच त्यांना पुरेसं असतं, हेच बिग बींच्या या कृतीतून स्पष्ट झालं.