मुंबई : मागील कित्येक वर्षांपासून सिनेविश्वात आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या आणि महानायक म्हणून मिळवणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर इतरांपुढं आदर्श प्रस्थापित करणाऱ्या या अभिनेत्यानंही सर्वांच्याच शुभेच्छांचा स्वीकार केला. मुख्य म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या जीवनातील अनेक किस्से, आठवणी, त्यांची कारकिर्द या साऱ्याविषयी चर्चा सुरु आहेत. याच चर्चांमध्ये एक विषय गाजतोय तो म्हणजे खुद्द बिग बिंनीच शेअर केलेल्या एका आठवणीचा.
मागील वर्षी एका कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी आपल्या दिल्लीतील महाविद्यालयीन दिवसांची एक आठवण सर्वांसमोर ठेवली होती. बिग बींनी शेअर केलेली ही आठवण पाहता सर्वांना प्रथमत: धक्काच बसला.
'मी तीन मूर्ती परिसरात राहायचो आणि नेहमीच्या प्रवासाठी बस सेवेचा वापर करायचो. ही बस संसद, कनॉट प्लेस अशा भागांतून जाऊन मग पुढे मला माझ्या ठिकाणी सोडत असे. तेव्हा या वाटेत कनॉट प्लेस थांब्यापासून मिरांडा हाऊस, आयपी कॉलेज येथील काही सुंदर मुली बसमध्ये चढत असत. त्यामुळे हा स्टॉप येऊन त्या कधी एकदा बसमध्ये चढतात याचीच आम्ही वाट पाहत असायचो', असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी ही आठवण सांगण्यास सुरुवात केली.
बिग बींचा हा उलगडा अनेकांना धक्का देऊन गेला होता. पुढे याचविषयी सांगत ते म्हणालेले, 'पुढे काही वर्षांनी पदवीधर झाल्यानंतर मला नोकरी मिळाली. तेव्हाच आमच्या त्या बसमधून प्रवास करणाऱ्या सुंदर मुलींपैकी एक मुलगी मला भेटली. त्यावेळी एक बाब लक्षात आली की, तिच्याकडेही सांगण्यासाठी खूप गोष्टी होत्या.'
अमुक एका मुलीच्या सांगण्यानुसार ती आणि तिच्या मैत्रिणी अमिताभ बच्चन त्या बसमधून कधी येणार याची वाट पाहत असत. ती त्या बस थांब्यावर तिच्या प्राण नावाच्या एका मित्रासोबत बस येण्याची वाट पाहायची, असंही बिग बींनी ही आठवण शेअर करताना सांगितलं होतं. जेव्हा जेव्हा बस यायची तेव्हा तेव्हा तिच्या मनात एकच विचार यायचा, 'प्राण (तिचा मित्र) जाए पर, बच्चन ना जाए.....' महाविद्यालयीन दिवसांमध्ये घडलेल्या अनेक गोष्टी या प्रत्येकासाठीच खास असतात. किंबहुना त्या कित्येकदा क्षणिक असल्या तरीही तितक्याच सुखावहसुद्धा असतात. आठवणींच्या याच गाठोड्यातून बिग बींनी सर्वांसमोर आणलेला हा किस्सा आता नेमका चाहत्यांमध्ये का गाजतोय याचा अंदाज तुम्हालाही आला असेलच.