'या' महिन्यात फरहान- शिबानीच्या लग्नाचा धुमधडाका

लग्नाविषयी विचारताच फरहान म्हणाला... 

Updated: Mar 6, 2019, 12:57 PM IST
'या' महिन्यात फरहान- शिबानीच्या लग्नाचा धुमधडाका  title=

मुंबई : कलाकार हे कलाविश्वातील त्यांच्या योगदानामुळे जितके चर्चेत असतात, तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटींच्या या मांदियाळीत गेल्या बऱ्याच महिन्यांपासून एका जोडीवर अनेकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब उघड झाली. सोशल मीडियाच्या वर्तुळातही सुरेख अशा पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची ग्वाही देणारी ही जोडी म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री, मॉडेल, सूत्रसंचालिका शिबानी दांडेकर. 

फरहान आणि शिबानी आता त्यांच्या नात्याविषयी उघडपणे बोलत असून, त्या दोघांच्याही सोशल मीडिया अकाऊंटवर त प्रेमाचा बहर आला आहे असंच म्हणावं लागेल. सध्या ही जोडी प्रकाशझोतात आली आहे ते म्हणजे त्यांच्या लग्नाविषयीच्या चर्चांनी. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यासोबत एका टॉक शोमध्ये फरहानने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने खासगी आयुष्याविषयी चर्चा करत त्यासंबंधीच्या प्रश्नांचीही मोकळेपणाने उत्तरं दिली. 

शिबानीसोबत लग्न करण्याच्या विचाराविषयी ज्यावेळी त्याला विचारण्यात आलं, तेव्हा एप्रिल किंवा मे अशा दोन महिन्यांचा त्याने मोठ्या अनोख्या पद्धतीने उल्लेख केला. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, 'In April, We May', असं म्हणत फरहानने या प्रश्नाचं उत्तर दिलं. लग्नाच्या तारखा किंवा इतर कोणतीही अधिकृत माहिती त्याने उघड केली नाही. पण, चाहत्यांमध्ये आनंदाचं उधाण येण्यासाठी त्याने दिलेली इकती माहितीही पुरेशीच आहे असं म्हणायला हरकत नाही. फरहान आणि शिबानीने काही दिवसांपूर्वी केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहता त्या दोघांचाही साखरपुडा झाल्याच्या चर्चा आहेत. पण, त्या वृत्तालासुद्धा दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता चाहते आणि साऱ्या कलाविश्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यावर.