VIDEO : जसलीनच्या 'या' रुपावर अनुप जलोटा नाराज

वेळ आली की परिस्थितीच नव्हे, तर माणसंही बदलतात

Updated: Oct 8, 2018, 03:32 PM IST
VIDEO : जसलीनच्या 'या' रुपावर अनुप जलोटा नाराज   title=

मुंबई: 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचं प्रत्येक पर्व हे तितकच वादग्रस्त आणि लक्षवेधी ठरतं. अशा या वादग्रस्त कार्यक्रमाच्या १२ व्या पर्वाच्या सुरुवातीपासून बराच मेलोड्रामा पाहायला मिळत आहे. यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने गाजण्यामागचं कारण आहे अनुप जलोटा आणि त्यांची बहुचर्चित प्रेयसी, जसलीन मथारू. 

जसलीन आणि जलोटा यांचं नातं 'बिग बॉस'मध्ये येण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरत होतं. ज्यानंतर जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हाही त्यांच्या जोडीवरच प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या होत्या. 

प्रत्येक टास्क किंवा मग 'बिग बॉस'च्या घरात एकंदर असणारा त्यांचा वावर पाहता जसलीन आणि जलोटा यांच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांसोबतच नेटकऱ्यांच्याही नजरा खिळल्या. 

रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेल्या या जोडीमध्ये वादविवाद झाले, ब्रेकअपचं वादळ आलं आणि नातं पुन्हा पुर्वपदावरही आलं. आता तर, या जोडीमध्ये विरहाचं वळण आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये जलोटा हे 'बिग बॉस'च्या घराबाहेर आले असून, ते घरातल्या मंडळींवर आणि सर्व घडामोडींवर नजर ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुख्य म्हणजे जलोटा यांच्या जाण्यानंतर ज्यावेळी तिला, 'तू आता सिंगल आहेस का', असं घरातील सदस्य विचारतात तेव्हा 'हो' असं उत्तर ती देतेय. हे उत्तर देतेवेळी जसलीनच्या चेहऱ्यावरील भाव आणि तिची एकंदर वर्तणूक पाहता 'झटका लगा...' असं म्हणत जलोटा नाराजी व्यक्त करत आहेत. 

वेळ आली की सगळीच माणसं बदलतात हाच प्रत्यय त्यांना इथे आल्याचं कळत आहे. तेव्हा आता या बहुचर्चित नात्यात पुढे कोणतं वळण येणार आणि 'बिग बॉस'च्या घरातच या नात्याला पूर्णविराम लागणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.