सिनेमा : बधाई हो
दिग्दर्शक : अमित शर्मा
कलाकार : आयुष्यमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सीकरी, शीबा चड्ढा
मुंबई : बॉलिवूडमध्ये मसाला आणि ठराविक पॅटर्नच्या सिनेमांची काही कमी नाही... हे सिनेमा सहजच १०० करोडोंची कमाईही करून जातात... परंतु, काही चोखंदळ दर्शक चांगल्या कहाण्यांना महत्त्व देताना दिसतात. कदाचित म्हणूनच सध्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टार्सपेक्षा सिनेमाच्या कथानकासाठी दर्शक सिनेमाघराकडे वळताना दिसत आहेत. असंच काहीसं घडताना दिसतंय 'बधाई हो' या सिनेमाच्या बाबतीत...
या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच हा सिनेमा इतर सिनेमांहून हटके आहे, हे चोखंदळ प्रेक्षकांच्या लक्षात आलं होतं... या सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.... आणि या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता हा सिनेमा प्रदर्शित झालाय.... आणि लोक सिनेमाघरात जाऊन जोरजोरात हास्यकल्लोळ करत लोटपोट होताना दिसत आहेत.
मेरठमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातली ही कहाणी... दिल्लीच्या लोधी कॉलनीमध्ये हे कुटुंब राहतंय. दोन तरुणांची आई प्रियंवदा कौशिक (नीना गुप्ता) गृहिणी आहे तर तिचा पती जितेंद्र कौशिक (गजराज राव) रेल्वेमध्ये टीटी आहे. जितेंद्र निवृत्तीच्या जवळ पोहचलाय... पण कथानक वेग घेतं जेव्हा पन्नाशी ओलांडलेल्या जितेंद्रची पत्नी गर्भवती असल्याचं समजतं... प्रियंवदाची ही गर्भधारणा तिच्या जवळपासच्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतो.
यामुळे सर्वात मोठा धक्का बसतो तो तिच्या दोन तरुण मुलांना म्हणजेच नकुल (आयुष्यमान खुराना) आणि गूलर (शर्दुल राणा) यांना... नकुल स्वत: रेने (सान्या मल्होत्रा) या मुलीच्या प्रेमात आहे आणि तिच्याशी विवाहाची स्वप्न पाहतोय... आणि मध्येच त्याला आपली आई गर्भवती असल्याचं समजल्यानंतर त्याच्यासाठी ही परिस्थिती फारच लज्जास्पद ठरते.
या सिनेमाचे लेखक अक्षत घिलडियल आणि दिग्दर्शक अमित शर्मा यांनी या सिनेमाला चार चाँद लावलेत... त्यांनी असा विषय निवडावा आणि तो लोकांसमोर खेळकर आणि उत्तम पद्धतीनं मांडावा, यासाठी ते कौतुकास पात्र आहेत.
या विषयात अनेक संवेदना आहेत... एकीकडे मध्यमवर्गीय समाजानं स्वत:साठीच ठरवलेले ठोकताळे... लोकलज्जा... आणि दुसरीकडे आई होण्याचा आनंद... लोकांना कोणतीही शिकवणी न देता खेळकर पद्धतीनं प्रेक्षकांसमोर मांडण्याचा या सिनेमातून प्रयत्न करण्यात आलाय... आणि तो यशस्वी झालाय असं म्हणता येईल. हा सिनेमा तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून पाहू शकाल...
इंडस्ट्रीमध्ये स्क्रिप्ट निवडण्याचा चोखंदळपणा आयुष्यमानकडे जेवढा आहे तेवढा कुणाकडे अभावानेच आढळेल असं म्हणता येईल. पण, खरं तर हा सिनेमा नीना गुप्ता आणि गजराज राव यांचाच आहे... आणि या दोघांनीही आपल्या लाजवाब अभिनयानं या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.
सिनेमाचं सरप्राईज पॅकेज म्हणजे आजी.... सुरेखा सीकरी... सुरेखा टीव्ही सीरियलपासून ते सिनेमापर्यंत प्रत्येक भूमिकेज जिवंतपणा आणतात... सान्या मल्होत्रानंही आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय.