सनी देओल भाजपमध्ये जाताच 'ढाई किलो का हाथ'च्या मीम्सना उधाण

पाहा नेटकरी नेमकं म्हणतायत तरी काय

Updated: Apr 23, 2019, 07:44 PM IST
सनी देओल भाजपमध्ये जाताच 'ढाई किलो का हाथ'च्या मीम्सना उधाण  title=

मुंबई : loksabha election 2019 हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश करणं ही काही नवी बाब नाही. त्यात सध्या सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळी भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे अभिनेता सनी देओलचं. सनीने नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन आणि पियुष गोयल यांच्या उपस्थिीत पक्षात प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूरहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहे. 

सनीने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर अनेकांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनी सनीवर फक्त शुभेच्छांचा वर्षावच केला नाही, तर काही धमाल ट्विट आणि मीम्स तयार करत या सर्व प्रकरणाला एक विनोदी वळणही दिलं. सनी देओलच्याच चित्रपटातील काही गाजलेल्या संवादांचा आणि दृश्यांचा संदर्भ घेत हे मीम्स साकारण्यात आले आहेत. ज्यामध्ये त्याने सर्जिकल स्ट्राईक केला तर तो नेमका कसा असेल, याची झलकही पाहायला मिळत आहे. 

काँग्रेसचं चिन्हं असणाऱ्या हाताला आता सनी देओलच्या ढाई किलोच्या हाताची टक्कर असणाऱ आहे, असं म्हणतही काही नेटकऱ्यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर, बॉर्डर या चित्रपटातील एका दृश्याचा व्हिडिओ पोस्ट करत भाजप कार्यकर्ते आता सुट्टी नाही मागू शकत असंही ट्विट केलं आहे. 

गुरुदासपूर मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात 

सनी देओल लढणार असलेल्या गुरुदासपूर या मतदारसंघातून यापूर्वी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्तच होती. दरम्यान, सनीआधी या जागेवर विनोद खन्ना यांची पत्नी कविता यांच्या नावाचीही चर्चा होती. पण, हे नाव मागे पडलं आणि आता सनी देओलला ही संधी मिळण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत.