मुंबई : सध्या अनेक सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तर अनेक सिनेमांची चित्रिकरण सुरु आहेत. अनेक सिनेमा रिलीजच्या रांगेत असताना नुकतीच एका सिनेमा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अप्सरा सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमा गेले अनेक दिवस प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड देण्यात आली असून अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग,समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर,कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
एका तरुणाच्या मनातल असलेलं एका अप्सरेचं चित्र आणि त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर "अप्सरा" हा चित्रपट बेतला आहे. प्रेमकथा असल्याने स्वाभाविकपणे गाणी या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. टीजरवरूनच या चित्रपटाची कथा, अभिनय, संगीत या सगळ्यातलं वेगळेपण अधोरेखित होत आहे. त्यामुळे आता १० मे रोजी "अप्सरा" मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.