Anil Mehta Last Phone Call To Malaika: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. आपल्या राहत्या घराच्या इमारतीमधून खाली उडी मारत त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. मुंबईती वांद्रे येथे ते आणि पत्नी एकत्र राहत होते. समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास घराच्या बाल्कनीमधून खाली उडी घेण्याआधी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कॉल केला होता.
अनिल मेहता यांनी राहत्या घराच्या बाल्कनीतून खाली उडी मारली तेव्हा पत्नी जॉयसी बाजूच्याच रुममध्ये होत्या. रोज सकाळी अनिल पेपर वाचत बाल्कनीमध्ये बसायचे. बुधवारी अशाचप्रकारे अनिल पेपर वाचत बसल्याचं समजून जॉयसी त्यांची विचारपूस करायला गेल्या असता अनिल तिथे नव्हते. त्यावेळेस त्यांना अनिल यांनी बाल्कनीमधून खाली उडी मारल्याचं समजलं.
अनिल यांना कोणत्याही आरोग्यविषयक समस्या नव्हत्या असं जॉयसी यांनी पोलिसांना सांगितलं. अनिल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटास्थळी धाव घेतली. अनिल यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. "आम्ही या प्रकरणामध्ये तपास करत असून आमची टीम माहिती मिळाल्यापासून इथेच आहे. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. आमची फॉरेन्सिक टीमही इथे आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करत आङोत. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या वाटते. आम्ही पुढील तपास करत आहोत," असं पोलिसांनी प्रसारमाध्यांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी अनिल मेहता यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन केला होता, अशी बातमी 'इंडिया टीव्ही'ने दिली आहे. आपल्या दोन्ही मुलींना फोन करुन अनिल मेहता यांनी, 'मी आता थकलोय,' असं सांगितलं होतं.
ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यामध्ये होती. एका कामानिमित्त ती पुण्याला गेली होती. तिला वडिलांबद्दल समजल्यानंतर ती तातडीने मुंबईत दाखल झाली. इमारतीमधून आतमध्ये जातानाच मलायकाला भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मलायकापाठोपाठ वडिलांच्या घरी दाखल झालेल्या अमृतालाही वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का बसल्याचं तिला पाहता क्षणी जाणवत होतं.
अनिल मेहता यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांच्या घरी सर्वात आधी मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाझ खान पोहोचला होता. त्यानंतर संपूर्ण खान कुटुंब इथे पोहोचलं. यामध्ये सलीम खान, हेलन, सलमान खान, सोहेल खान, अर्हान खान, अल्विरा अग्निहोत्री आणि इतर सदस्यांचा समावेश होता.
मालायकाचा प्रियकर अर्जून कपूरही या ठिकाणी आला होता. करिना कपूर खान, अनन्या पांडे, रितेश सिंधवानी, चंकी पांड्ये, सैफ अली खान आणि इतरांनाही अनिल मेहता यांना श्रद्धांजली वाहत कुटुंबाचं सांत्वन केलं.