Anil Kapoor With Laxmikant Berde Photo : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अनिल कपूर सध्या त्यांच्या 'द नाईट मॅनेजर' (The Night Manager) या वेब सीरिजमुळे चर्चेत आला आहे. अनिल कपूर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनिल कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्यासोबतचा हा फोटो आहे.
अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनिल कपूर हे मराठी लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो 'हमाल दे धमाल' (Hamaal De Dhamaal) या चित्रपटातील पुरस्कार मिळतानाचा सीन आहे. या फोटोत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हातात पुरस्कार घेतल्याचे दिसत आहे. तर त्यांच्या शेजारी अनिल कपूर आहेत. अनिल कपूर यांनी हा फोटो शेअर करत "संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. त्यासोबत माझ्या एकमेव मराठी चित्रपट हमाल दे धमाल चित्रपटाची आठवण. या चित्रपटात काम करणं माझ्यासाठी खूप मोठी आणि सन्मानाची गोष्ट आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा मित्र लक्ष्मीकांत बेर्डेच्या सगळ्यात अप्रतिम चित्रपटांपैकी एक आहे आणि आजही आपल्याला त्याची आठवण येते", असे कॅप्शन अनिल कपूर यांनी दिले आहे. अनिल कपूर यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
काल 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिवस हा 27 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला होता. त्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी 27 फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. वि.वा. शिरवाडकर हे मराठीतील नावाजलेले कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि मानवतावादी होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि गरिबीसारख्या सामाजत होत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर त्यांनी लिखाण केले आहे. वि.वा. शिरवाडकर यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या.
हेही वाचा : Salman Khan चा थोरला भाऊ अरबाझ खानचं Shah Rukh Khan बाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...
कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचे 10 मार्च 1999 साली निधन झाले. त्यानंतर सरकारनं निर्णय घेतला की ज्या दिवशी वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म झाला त्याच दिवशी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या निमित्तानेच मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकांचा गौरव करण्यासाठी सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही सुरू करण्यात आले.