'डॉक्टरांनी मृत समजून मला कचऱ्यात टाकलं...', संघर्ष ऐकून बिग बीही भावूक

...यांच्या हृद्यद्रावक कहाणीने बिग बींसह सर्वचजण नि:शब्द झाले.  

Updated: Aug 23, 2019, 04:51 PM IST
'डॉक्टरांनी मृत समजून मला कचऱ्यात टाकलं...', संघर्ष ऐकून बिग बीही भावूक title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'च्या ११व्या सीजनमध्ये एक अशी स्पर्धक पोहोचली, ज्यांची कहाणी ऐकून सर्वांच जण थक्क झाले. केबीसीच्या हॉट सीटवर पोहोचलेल्या नुपूर चौहान यांच्या हृद्यद्रावक कहाणीने बिग बींसह सर्वचजण नि:शब्द झाले.

नुपूर चौहान यांना एक अतिशय दुर्धर आजार आहे. त्यामुळे त्या नीट चालू शकत नाही. पण नुपूर चौहान यांनी कधीही व्हिलचेअर न वापरण्याचा निश्चिय केला. 

नुपूर या शिक्षिका आहेत. त्यांना Mixed Cerebral Palsy असा आजार आहे. हा आजार असलेली मुलं त्यांच्या वयाच्या काही वर्ष मागे असतात किंवा त्यांच्या शरीराचा एखादा अवयव काम करत नाही. पण नुपूर यांचा मेंदू मात्र सर्वसामान्यांप्रमाणेच काम करतो.

नुपूर यांनी त्यांच्या आयुष्यातील अतिशय आव्हानात्मक अशा मन हेलावून टाकणाऱ्या अनेक प्रसंगांबाबत सांगितलं. या प्रसंगाबाबत बोलताना त्यांनी, 'माझा जन्म सिजेरियनने झाला. त्यावेळी मला काही सर्ज‍िकल इंन्स्ट्य्रूमेंट लावण्यात आले, पण जन्मावेळी मी रडली नसल्याने, डॉक्टरांनी मृत समजून मला कचऱ्यात टाकलं असल्याचं' त्यांनी सांगितलं.

नुपूर सांगत असलेली प्रत्येक गोष्ट बिग बींसह सर्वांच्याच मनात चटका लावून जात होती. 'डॉक्टरांनी कचऱ्यात टाकल्यानंतर, आजी आणि मावशीने एकाला पैसे देऊन मला कचऱ्यातून बाहेर काढलं. आजीने मी कदाचित जिवंत होईल म्हणून माझ्या पाठीवर मारण्यास सांगितलं आणि मारता मारताच मी रडायला लागले. श्वसनासाठी गरजेचा ऑक्सिजन कमी पडत होता, त्यामुळे मी रडले नव्हते. पण त्यानंतर पुढे १२ तास मी रडत असल्याचं, त्यांनी सांगतिलं.

'त्यावेळी मला धनुर्वात आणि कावळी झाल्याचं समजून चुकीची इंजेक्शन देण्यात आली. डॉक्टरांच्या चुकीमुळे माझी तब्येत इतकी बिघडली की, मी सर्वसामान्य मुलांप्रमाणे उभी राहू शकली नाही. माझी तब्येत इतकी खराब नव्हती. जितकी ती डॉक्टरांच्या चुकीमुळे बिघडली' असल्याचं त्या म्हणाल्या. 

स्वत:सोबत घडलेल्या या घटनेमुळे त्यांनी, सर्व डॉक्टरांना आपली जबाबदारी पूर्णपणे ओळखण्याचं आवाहन केलं आहे.

नुपूर यांच्या या संघर्षाला बिग बींनीसह सर्वांनीच उभं राहून सलाम केला. 

जीवनाच्या प्रवासात नुपूर यांनी आतापर्यंत केलेला हा संघर्ष मन हेलावणारा आहे. यांनी स्वत:ची जिद्द, धाडस, आत्मविश्वासाच्या जोरावर इथपर्यंतचा केलेला संघर्षमय प्रवास नक्कीच प्रशंसनीय असून तो इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.