मुंबई : प्रेमाची काही वेगळी रुपं कलाकृतींच्या माध्यमातून आजवर आपल्या भेटीला सातत्यानं येत राहिली. यातच भर टाकत प्रेमाच्या नव्या परिभाषाही आता आपल्या समोर आल्या आहेत.
प्रेम हे शरीरसुखापलीकडेही जाऊन अनेकदा भावनाप्रधानही असतं. प्रेम आपल्याला चांगल्या सवी लावतं, योग्य मार्गावर आणतं, आधारही देतं. प्रेम क्षणोक्षणी आपल्याला एक नवी शिकवण देऊन जातं. नव्या अनुभवांनी आपली ओंजळ भरतं.
प्रेम हे असंच असतं. अनेकांसाठी ते आपआपल्यापरीनं खास असंत. मुळात प्रेमाला वयाच्याही मर्यादा नसतात. अशाच एका नात्यावर Modern Love Mumbai या Amazon Prime वरील सीरिजमधून प्रकाश टाकण्यात आला आहे. (amazon prime Modern Love Mumbai sarika danesh rizvi chemistry)
अभिनेत्री सारिका (दिलबर) आणि दानेश रिझवी (कुणाल) यांनी या सीरिजमधील लघुकथेत मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. एकिकडे 60 वर्षांची दिलबर आणि दुसरीकडे 20 वर्षांचा कुणाल. पण, या दोघांच्याही मनात एकमेकांप्रती असणाऱ्या भावना मात्र वयाच्या अंतराची तमाच बाळगत नाहीत.
अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित या लघुकथेमध्ये एक दृश्य असंही आहे, जिथं कुणाल दिलबरप्रती आपल्या मनात असणाऱ्या सर्व भावना बोलून दाखवतो. तिच्या हाती एक न्यूड चित्र देतो.
दिलबरसाठी हे सर्व अनपेक्षित असल्यामुळं तिची यावर येणारी प्रतिक्रिया स्वाभाविक असते. अभिनेत्री सारिका यांनी दिलबर साकारताना मनं जिंकणारा अभिनय केला आहे. साठ वर्षांची महिलासुद्धा तरुण मुलाकडे कशी आकर्षित होते हे दाखवताना या गोष्टीत कुठेच मन खट्टू करणारं दृश्य नाही.
अतिशय संवेदनशील नातं दाखवताना सारिका आणि दानेश या दोघांनीही तितकाच कमाल अभिनयही केला आहे. सारिका आणि कुणालमध्ये नजरेतून होणारे संवादच त्यांच्या मूळ संवादापेक्षा जास्त बोलके ठरतात.
ही गोष्ट जसजशी पुढे जाते तसतसं एका अनोख्या प्रेमाच्या नात्यात आपलंही मन गुरफटून जातं. जिथे समाजात प्रेमाला जागा मिळतानाही अडचणी येतात तिथेच मन मोठं करुन नातं आणि प्रेम जपताणी आणि जगणारी ही माणसं पाहून कौतुक वाटतं.