'अब तो बच्चन बनना है', आलिया भट्टने भावासाठी दाखवला 'जिगरा', जबरदस्त अ‍ॅक्शनने वेधलं लक्ष

आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'जिगरा' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्यांदाच आलिया ॲक्शन अवतारात दिसणार आहे. आलिया भट्टने पुन्हा एकदा तिची अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत असणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 8, 2024, 02:19 PM IST
'अब तो बच्चन बनना है', आलिया भट्टने भावासाठी दाखवला 'जिगरा', जबरदस्त अ‍ॅक्शनने वेधलं लक्ष  title=

Jigra Trailer: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी आलियाला ओळखलं जातं. अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकले आहेत. गेल्या वर्षी आलियाने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या रोमँटिक चित्रपटात काम केलं होतं. आता ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तिचा अॅक्शनचा पराक्रम दाखवणार आहे. 

आलिया आगामी अॅक्शन थ्रिलर 'जिगरा' चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेका साकारणार आहे. आलिया भट्टने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

'जिगरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

'जिगरा' या चित्रपटात एका बहिणीची कथा आहे. जी तिचा भाऊ संकटात असताना शस्त्र उचलते. आपल्या भावाला तुरुंगातून सोडवण्यासाठी ती खूप प्रयत्न करते. ज्यामध्ये ती आगीशी खेळते, गोळ्या झाडते. एक वेळ अशी येते की ती स्वत:ची नस देखील कापायला तयार होते. वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारी आलिया भट्ट 'जिगरा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि इमोशनने परिपूर्ण आहे. 

भावासाठी आलिया बनली बच्चन

नुकताच 'जिगरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आलिया भट्टची सुरुवात वेदनादायक कथेपासून होते. ज्यामध्ये ती म्हणते की, आईला देवाने हिरावून घेतले. वडिलांनी स्वत:चा जीव घेतला. दूरच्या एका नातेवाईकाने आसरा दिला आणि रिकामे भाडे गोळा केले.  सोडा भाटिया साहेब. गोष्ट खूप मोठी आहे. भावाकडे फार कमी वेळ आहे. कथा ऐकणारी व्यक्ती म्हणते की, मग कारागृहाच्या भिंती पाडूया.

या चित्रपटात मनोज पाहवा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये तो सत्याला मार्गदर्शन करताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये मनोज पाहवाने 'बच्चन नही बनाना है, बचकर निकलना है' हा डायलॉग बोलला आहे. यावर आलिया म्हणते की, 'आता मला बच्चन बनायचं आहे.' 

'जिगरा' चित्रपट कधी प्रदर्शित होणार? 

आलिया भट्टच्या 'जिगरा' या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. करण जोहरच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती केली आहे. वेदांग रैनाने आलियाच्या भावाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.