Kesari Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ची गर्जना, कमाईचा आकडा पोहोचला....

चित्रपटाच्या कमाईचे आकडे सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहेत.

Updated: Mar 25, 2019, 11:57 AM IST
Kesari Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ची गर्जना, कमाईचा आकडा पोहोचला....  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : Kesari Box Office Collection अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘केसरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. होळीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरही ‘केसरी’चाच रंग चढला आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

खिलाडी कुमारचा अस्सल पंजाबी बाज असणाऱ्या या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांमध्ये अनुक्रमे जवळपास २१, १७, २० आणि २२ कोटी रुपयांची कमाई केली. या आकड्यांना जोडलं असता लक्षात येत आहे की, पहिल्या चार दिवसांमध्येच चित्रपटाच्या कमाईचे आकडे हे ७० कोटींच्याही पलीकडे गेले आहेत. गुजरात, बिहार, राजस्थान या भागांमध्ये ‘केसरी’ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. तर, मुंबईतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्श आणि रमेश बाला यांनी ‘केसरी’च्या कमाईचे आकडे सर्वांपर्यंत पोहोचवले आहेत. सारागढीच्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून इतिहासाच्या पानातं हरवलेल्या अशा एका युद्धाच्या स्मृती जागवण्यात आल्या आहेत, जेथे प्रेक्षकांमध्येही देशाभिमानाची भावना ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या २१ शीख सैनिकांनी कसा प्रकारे एक असामान्य कर्तृत्त्व करत अफगाण सैनिकांशी लढा दिला होता याचीच शौर्यगाथा ‘केसरी’तून मांडण्यात आली आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांची पसंती मिळवणारा हा चित्रपट आता येत्या काळात आणखी किती गल्ला जमवतो, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.