Vikrant Massey Gets Threats : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला सतत जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. या सगळ्या धमक्यांमध्ये आता अभिनेता विक्रांत मैसीला देखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. विक्रांतला जी धमकी मिळाली आहे त्याचा आणि सलमान खानचा काहीही संबंध नाही. त्याला एका वेगळ्याच कारणामुळे धमकी मिळाली आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
नुकताच विक्रांत मैसीचा द साबरमती रिपोर्ट या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये विक्रात गेल्या अनेक दिवसांपासून व्यग्र आहे. तर विक्रांतचा हा चित्रपट सत्य घटनेवर अर्थात साबरमती येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणावर आधारीत आहे. तर ट्रेलरच्या लॉन्चच्या कार्यक्रमात विक्रांतनं त्याला येणाऱ्या धमक्यांविषयी खुलासा केला आहे. त्याशिवाय हे देखील सांगितलं की तो आता टार्गेटवर का आहे? विक्रांत म्हणाला, 'मला सतत धमकी मिळत आहे. सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मला धमकीचे मेसेज मिळत आहेत. याविषयी कोणी काही विचारलं नाही, त्यामुळ मी आधी सांगितलं नाही. पण मला एक सांगायचं आहे की आम्ही कलाकार आहोत आणि गोष्टी सांगतो. लोकं काय विचार करतात आणि काय बोलतात याकडे लक्ष देत नाही. फक्त इतकं सांगायचं आहे की हा चित्रपट पूर्णपणे सत्य घटनेवर आधारीत आहे.'
विक्रांत मैसीचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट यावर्षी 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 आणि इतर कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून साबरमी रिपोर्टला घेऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत होती आणि त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. चित्रपटात विक्रांत मैसीशिवाय राशी खन्ना आणि रिद्धि डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. द साबरमती रिपोर्टचं दिग्दर्शन रंजन चंडेलनं केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरनं केली आहे.
हेही वाचा : अभिषेकसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर 'हे' काय बोलली निम्रत कौर
दरम्यान, आता या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत म्हटलं आहे. त्यामुळे आता चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.