मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. २१ जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'कबीर सिंग'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. 'कबीर सिंग' चित्रपटामुळे शाहिदच्या करियरला वेगळीच कलाटणी मिळाली. 'कबीर सिंग'च्या यशानंतर शाहिदची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. शाहिद त्याच्या एक चित्रपटासाठी १०-१२ कोटी घेत होता, आता मात्र शाहिदने यात चार पटींहून अधिक वाढ केली आहे.
'कबीर सिंग' शाहिदच्या करियरमधील टर्निंग पॉइंट ठरला. शाहिदने साकारलेल्या भूमिकेचं चित्रपट समिक्षकांसह प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं. 'कबीर सिंग'च्या दमदार यशानंतर शाहिदला आणखी एका तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी ऑफर मिळाली आहे.
'बॉलिवूड लाईफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका क्रिकेटरच्या जीवनावर आधारित असणारा तेलुगू चित्रपट 'जर्सी'च्या हिंदी रिमेकसाठी शाहिद विचारण्यात आलं आहे. मात्र शाहिदने या चित्रपटासाठी तब्बल ४० कोटींची मागणी केली आहे. 'जर्सी'मध्ये एका क्रिकेटरचा भावनिक प्रवास दाखवण्यात आला आहे. जो क्रिकेट टीममध्ये आपली जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.
'जर्सी' गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला होता. २०१९ च्या एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटाला प्रेक्षकांचा, चित्रपट समिक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे आता क्रिकेटरच्या भूमिकेत शाहिदला पुन्हा एकदा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
याआधी २००९ मध्ये 'दिल बोले हडिप्पा'मध्ये शाहिदने क्रिकेटरची भूमिका साकारली होती.
'कबीर सिंग'च्या प्रमोशनवेळी शाहिदने, माझ्याकडे कबीर सिंगनंतर कोणताही चित्रपट नाही, त्यामुळे माझ्याकडे आता कामही नसल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र आता शाहिदला 'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकसाठी निश्चित करण्यात आल्यास, या चित्रपटातही शाहिद पुन्हा दमदार कामगिरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.