टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या जवळची व्यक्ती Afganistan मध्ये; भयावह वास्तव ऐकून होईल काळजाचं पाणी

मला इथून बाहेर पडायचंय.... त्यांची आर्त हाक 

Updated: Aug 19, 2021, 07:45 PM IST
टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या जवळची व्यक्ती Afganistan मध्ये; भयावह वास्तव ऐकून होईल काळजाचं पाणी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री नुपूर अलंकार हिनं नुकतंच तिच्या कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकल्याची माहिती उघड केली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तिथं त्यांना राजकीय सत्ताबदलाच्या परिणामांना सामोरं जावं लागत आहे. 

एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नुपूरच्या बहिणीचे पती, कौशल 15 ऑगस्ट रोजी भारतात परतणं अपेक्षित होतं. पण, (Taliban) तालिबान राज सुरु झाल्यामुळं ते शक्य झालं नाही. कौशल यांनी माध्यमांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत अफगाणिस्तानातील भयावह परिस्थिती सांगितली. 

'इथं खुप भीतीदायक वातावरण आहे. मी जेव्हा 16 जुलैला काबूल येथे आलो तेव्हा इथं सर्वकाही ठिक होतं. इतक्या कमी वेळात परिस्थिती इतकी विदारक होईल अशी अपेक्षाही कोणी केली नव्हती. मी खरंतर 15 जुलैलाच भारतात परतणार होतो. पण, माझं काम संपलं नसल्यामुळं मी भारतीय दुतावासात व्हिसाची मुदत वाढवून मागण्यासाठी गेलो होतो.', असं कौशल म्हणाले. 

सध्याच्या घडीला त्यांच्यावर मित्राच्या ऑफिसमध्ये राहण्याची वेळ आली आहे. जिथं सतत वीजपुरवठा खंडीत होत असतो, पाण्याचाही पुरवठा कमीच आहे, इतका की आठवड्यातून तीनदाच अंघोळ करणं शक्य होतं. 

आताच्या आता थांब नाहीतर....; अभिनेत्रीला क्रूर तालिबानकडून धमकी 

कौशल यांनी सांगितलेल्या परिस्थितीचा विचार करुनही मनात धडकी भरत आहे. कारण, मोबाईलही त्यांना कारच्या बॅटरीवर चार्ज करावा लागत आहे. तालिबान्यांकडून इथं सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मोबाईल सेवाही खंडीत करण्याचे आदेश असल्यामुळं घरी या वेळेपूर्वीच संपर्क साधावा लागत आहे. इथं रस्त्यावर तालिबानी फिरत आहेत, मला आता एकच गोष्ट करायचीये ती म्हणजे इथून बाहेर पडून भारतात यायचंय, कुटुंबाला भेटायचंय. 

कौशल यांनी भारतीय दुतावास आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना अद्यापही तिथून काहीच उत्तर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. नुपूर आणि त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, आतापर्यंत तरी सर्व काही ठीक आहे, पुढचं पुढे बघू अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजाचं पाणी झालं. परिस्थितीचं गांभीर्य पाहता आता कौशल भारतात कधी येतात याकडेच त्यांच्या कुटुंबाच्या नजरा लागल्या आहेत.