Zubeida Begum And Hanwant Singh: मीना कुमारी यांना ट्रेजेडी क्वीन म्हणून ओळखले जाते. मात्र, आज आम्ही तुम्हाला भारतीय सिनेमाच्या अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिने आयुष्यात फक्त संघर्ष केला आहे. 50च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असूनही तिच्या खासगी आयुष्यात अनेक संकटं आली. ऐन तारुण्यात अभिनेत्रीचा व तिच्या पतीचा रहस्यमयी मृत्यू झाला. जुबैदा बेगम असं या अभिनेत्रीचं नाव असून तिच्या आयुष्यावर जुबैदा नावाचा चित्रपटदेखील आला होता. करिश्मा कपूर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
अभिनेत्रीच्या वडिलांनी तिचं जबरदस्ती लग्न लावलं त्यानंतर घटस्फोट घेण्यासही भाग पडलं. जुबैदा बेगम यांच्यावर नंतर अशी वेळ आली की त्यांना महफिलमध्ये गाणं गावं लागलं. जुबैदा बेगम यांनी दुसरं लग्न केलं. मात्र, तिथंही त्यांना संसारसुख मिळालेच नाही. विमान अपघातात त्यांचा पतीसह मृत्यू झाला. असं म्हणतात की 72 वर्षांनंतरही त्यांचा आत्मा उमेद भवन पॅलेसमध्ये वावरतोय. जुबैदा या जोधपूरच्या महाराणीदेखील होत्या. जुबैदा जौधपूरच्या महाराणी कशा बनल्या आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू कसा झाला जाणून घेऊया.
जुबैदा बेगम यांना विद्या राणी नावानेही ओळखतात. त्यांचे वडिल कासिमभाई मेहता हे उद्योजक होते. तर, आई फैजा बाई एक गायिका. जुबैदा यांनी आर्य समाजाच्या रिती रिवाजांनुसार धर्म परिवर्तन केले आणि विद्या राणी झाल्या. त्यानंतर त्यांनी जोधपूरचे महाराजा हनवंत सिंह यांच्यासोबत लग्न केले. 17 डिसेंबर 1950 साली हनवंत सिंह यांची छोटी राणी बनून त्या जोधपूरमध्ये आल्या. त्यानंतर 1951मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव राव राजा हुकूम सिंह असं ठेवण्यात आलं. जुबैदा यांचं याआधीही एक लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगा होता. त्यांचे नाव खलिद मोहम्मद असं आहे.
खलिद मोहम्मद यांनी करिश्मा कपूरला मुख्य अभिनेत्री घेऊन जुबैदा चित्रपट लिहला होता. 2001 मध्ये हा चित्रपट आला होता. खलिद यांची आई जुबैदाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. खलिद मोहम्मद हे दिग्दर्शक, पत्रकार, स्क्रीनरायटर आणि फिल्म एडिटर आहेत.
राज घराण्याला सून म्हणून पसंत नव्हती...
महाराजा हवनंत सिंह यांनी जुबैदासोबत लग्न केल्यानंतर उम्मेद भवन पॅलेस सोडला होता. तसंच, त्यांना जोधपूरच्या छोट्या राणीचा दर्जा दिला होता. जेव्हा हनवंत सिंह जुबैदा यांना जोधपूरला घेऊन गेले तेव्हा राजघराण्याला मुस्लिम अभिनेत्री सून म्हणून पसंत नव्हती. तसंच, त्यांनी तीला स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हनवंत सिंह यांनी उम्मेद भवन पॅलेस सोडला आणि मेहरानगढच्या किल्ल्यात राहण्यास सुरुवात केली.
जुबैदा आणि महाराज हनवंत सिंह यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. तेव्हाही जुबैदा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मृत्यूनंतरही त्यांना बदनाम करण्यात आलं होतं. त्यांच्या मृत्यूच्यावेळी जुबैदा आणि हनवंत सिंह यांचा मुलगा राव राजा हुकूम सिंह फक्त एक वर्षांचा होता. तेव्हा त्याचा सांभाळ त्याची सावत्र आई कृष्णा कुमारी यांनी केला.
एका रिपोर्टनुसार, जुबैदा आणि महाराज हनवंत सिंह यांच्या मृत्यूनंतर काहीच वर्षांत त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने मुलाचे शिर धडावेगळे करत त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. 1981मध्ये राव राजाचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या शरीरावर 20 खुणा होत्या. काहींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आत्महत्या केली होती तर राजकारणामुळं त्यांचा बळी गेला, असं म्हणण्यात येत. मात्र आजही हुकुम सिंहच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे.
एकीकडे दावा केला जातो की, आजही जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये जुबैदा यांचा आत्मा फिरतो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जुबैदा यांचा आत्मा पॅलेसच्या आसपास भटकतो. काही वर्षांपूर्वी त्यांचा आत्मा एका शाही स्कुलच्या खोलीत कैद करण्यात आला होता. त्या खोलीला तंत्र-मंत्र व मोठ मोठे टाळे लावून बंद करण्यात आले आहे. ती खोली आजही बंदच आहे.