Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

 एकिकडे महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच 

Updated: Dec 11, 2019, 03:49 PM IST
Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच title=
Chhapaak trailer

मुंबई : एकिकडे महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच कलाविश्वातून या विषयाला तितक्याच संवेदनशीलपणे हाताळण्यात येत आहे. महिलांवर होणारे अत्याचार, हल्ले, ऍसिड हल्ले हे विदारक चित्र अनेक प्रयत्न करुनही मिटवता येत नाही आहे. प्रशासन, सर्वसामान्य जनता यांच्यासोबतच मानसिकताही कुठेतरी या साऱ्याला आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. याच असंख्य प्रश्नांचा आधार घेत आणि एका सत्य घटनेवर प्रकाश टाकत बॉलिवूडमध्ये एक चित्रपट साकारण्यात आला आहे. 

मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव आहे 'छपाक'. अभिनेत्री दीपिका पदुकोण Deepika Padukone आणि अभिनेता Vikrant Massey  विक्रांत मेसीच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

Panipat Movie Review : 'अर्जुना'च्या 'पानिपत'ची यशस्वी 'क्रिती'

ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर 'छपाक'मधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता विक्रांत मेसी लक्ष्मी यांचे साथीदार आलोक दीक्षित यांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक दृश्यं ही काळजात चर्रsss करणारी आहेत. अवघ्या दोन मिनिटांचं आणि १९ सेकंदांचा हा ट्रेलर ऍसिड हल्ल्यातील पीडितांच्या वेदना, त्यांचा संघर्ष आणि समाजाकडून त्यांना वास्तवात मिळणारी वागणूक अशी प्रत्येक झलक समोर ठेवत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

पाहा, वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर....

Chhapaak trailer 

मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आहे. मानवी हक्क दिवसाचं औचित्य साधत आपल्यासोबत गेल्या काही वर्षांपासून वावरणारी ही कथा आज प्रेक्षकांपुढे सादर करण्याचा आनंद दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी व्यक्त केला. शिवाय यावेळी 'मालती' ही व्यक्तीरेखा साकारत आपल्या झगमगाटाच्या विश्वाला दूर सारत एका वास्तववादी दुनियेचा स्वीकार केल्याबद्दल त्यांनी दीपिकाचेही आभार मानले. भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या हा चित्रपट साकारणं हे अतिशय आव्हानात्मक होतं हेसुद्धा मेघना गुलजार यांनी स्पष्ट केलं.