मुंबई : काही रोगांची नावं ऐकल्यानंतर लगेचच धडकी भरते. विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलेलं असो, हे रोग आणि त्यांच्याविषयीची असणारी मनातील भीती मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. अशाच रोगांपैकी एक म्हणजे कॅन्सर.
काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजन अभिनेत्री छवी मित्तल हिला कॅन्सरचं निदान झालं. योग्य वेळी उपचार घेतल्यामुळं छवी यातून सावरताना दिसत आहे. कॅन्सरला नमवत आयुष्य जगताना दिसत आहे. (Actress Chhavi Mittal Cancer Scar photos)
सोशल मीडियाच्या माध्यमातून छवी, तिचा हा संपूर्ण प्रवास चाहत्यांच्या भेटीला आणत आहे. जिद्द आणि धैर्याच्या बळावर कॅन्सरला नमवणाऱ्या छवीला पाहून सर्वांनाच आनंद होत आहे.
छवीनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट करत ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतरचा व्रण सर्वांसमक्ष आणला. पिवळ्या रंगाच्या एका गाऊनमध्ये छवी इथं दिसत आहे. आपल्या शरीरावर असणारा व्रण सर्वांनाच दिसेल. पण, मनावरचे व्रण मात्र कधीच दिसणार नाहीत; असं तिनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
व्रण लपवण्यासाठीच्या विविध मार्गांना आपण नकारच दिल्याचं सांगत हेच व्रण मला मी जिंकलेल्या लढाईची जाणीवर करुन देत राहतील हा दृष्टीकोन तिनं सर्वांसमोर मांडला.
छवीची ही पोस्ट वाचल्यानंतर तिचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलं. कॅन्सरचं निदान झाल्या क्षणापासून या रोगावर मात करण्यापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांनाच प्रेरणा देत आहे हे मात्र खरं.