पुणे : अभिनेते आणि मुंबई विद्यापीठाच्या नाट्य विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्याविषयी त्यांनी मांडलेल्या विचारांवर आपली भूमिका ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोमण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. परिणामी त्यांच्यावर ही रजेची कारवाई केली गेली. पुण्यात शिवसेना चित्रपट सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्याच्या वेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
सोमण यांनी माध्यमांशी संवाद साधतेवेळी ठामपणे आपली भूमिका मांडली. 'मी फक्त माझं मत मांडलं होतं आणि मी माझ्या विचारांवर ठाम आहे', असं ते म्हणाले. यावेळी त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं असण्यासंबंधीचा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत, आपण सुट्टीवर वगैरे नसून पुण्यात एका चित्रीकरणासाठी ठरलेल्या कार्यक्रमानुसार आल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.
सावरकरांविषयी आपले विचार मांडत असताना आपण कोणाचीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे आता कोणाची परवानगी का घ्यावी असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण या सर्व मुद्द्यावरील उत्तरं आणि स्पष्टीकरण हे येत्या काही दिवसांमध्ये गरज पडल्यास चौकशीलाही सामोरं जात चौकशी समितीपुढे मांडू असं म्हणत सोमण यांनी या प्रश्नाना बगल देण्याचा प्रयत्न केला.
वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
महाविकास आघाडीचं सरकार असताना सोमण यांची सदर कार्यक्रमाला असणाऱ्या उपस्थिती विषयी विचारलं असता, नातं हे एका व्यक्तीशी असलं. कोणत्याही पक्षाशी नव्हे. मुळात मी इथे एका कार्यक्रमासाठी आलो आहे आणि एक कलाकार म्हणून माझं नातं सर्वांशी चांगलंच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.