'...म्हणून मी तो चित्रपट नाकारला', तब्बल 23 वर्षांनी स्मृती इराणींचा खुलासा

या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया या तिघी मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

नम्रता पाटील | Updated: Apr 5, 2024, 06:01 PM IST
'...म्हणून मी तो चित्रपट नाकारला', तब्बल 23 वर्षांनी स्मृती इराणींचा खुलासा title=

Smriti Irani Rejected Dil Chahta Hai : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून स्मृती इराणी यांना ओळखले जाते. या मालिकेतील त्यांनी ‘तुलसी विरानी’ हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे त्या खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या. स्मृती इराणी यांची ही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या ते केंद्रीय मंत्री म्हणून काम करत आहेत. आता एका मुलाखतीत त्यांनी फरहान अख्तरच्या 'दिल चाहता है' या चित्रपटाबद्दल भाष्य केले.  

फरहान अख्तर लिखित आणि दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना हे अभिनेते प्रमुख भूमिकेत होते. तर या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया या तिघी मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण तुम्हाला माहितीये का, 'दिल चाहता है' या चित्रपटासाठी सर्वप्रथम स्मृती इराणी यांना ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी यासाठी नकार कळवला होता. आता एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या चित्रपटासाठी नकार देण्याचे कारण सांगितले आहे. 

अनेक चित्रपटांसाठी विचारणा

स्मृती इराणी यांनी ब्रूट या वेबसाईटला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी त्या म्हणाल्या, "मी जेव्हा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका करत होती, तेव्हा पहिल्या तीन महिन्यात मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली. या चित्रपटात मला प्रमुख अभिनेत्रींचे पात्र साकारण्यासाठी संधी मिळत होती. पण त्यावेळी मी आई होणार हे निश्चित केले होते. मला तेव्हा एक मूल हवे, असं वाटत होतं. त्यावेळी जर तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतलात तर तुम्ही पुन्हा सिनेसृष्टीत येऊ शकत नाही", असे म्हटले जायचे. 

"त्यामुळेच मी 'दिल चाहता है' या चित्रपटासाठीचे ऑडिशन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी अनेकांनी मला तू वेडी आहेस का? 'दिल चाहता है' या चित्रपटासाठी तू नकार देतेस, असे प्रश्न विचारले होते. या चित्रपटात माझी भूमिका नक्की कोणती असणार याची मला कल्पना नाही. पण ही प्रिती झिंटाची भूमिका नक्कीच नव्हती. त्यामुळे ही भूमिका कदाचित इतर अभिनेत्रींपैकी एकाची असावी, ज्या प्रमुख अभिनेत्री म्हणून चित्रपटात झळकल्या", असे स्मृती इराणी यांनी सांगितले. 

सध्या राजकारणात सक्रीय

दरम्यान स्मृती इराणी यांनी ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ याबरोबर अनेक मालिकेत काम केले. त्या अनेक बंगाली चित्रपटातही झळकल्या. पण आजही लोक त्यांना ‘तुलसी’ या पात्राच्या नावानेच ओळखतात. सध्या स्मृती इराणी या राजकारणात जास्त सक्रीय आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी 2019 पासून केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यासोबतच त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून देखील काम पाहिलेले आहे.