मुंबई: #MeToo या मोहिमेअंतर्गत आता दर दिवसागणिक काही अशी नावं समोर येत आहेत. ज्यामुळे अनेकांना धक्काच बसत आहे. फक्त हिंदीच नव्हे तर, संपूर्ण कलाविश्वातच सध्या ही हवा पाहायला मिळत आहे.
#MeToo च्या या वादळात आता आणखी एका अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले असून, त्याच्या अडचणीत वाढ झाल्याचं कळत आहे.
अभिनेता अर्जुन सारजा याच्यावर अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने लैंगिक शोषणाचे आरो केले आहेत.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विस्मया' या चित्रपटाच्या सेटवर आपलं लैंगिक शोषण झाल्याचे आरोप तिने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केले.
हीच ती वेळ आहे... तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची हीच ती वेळ आहे, असं म्हणत #MeToo या चळवळीने अनेक महिलांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी खुलेपणाने बोलण्याची प्रेरणा दिली आहे, असं या पोस्टमध्ये लिहिलेलं.
२०१६ मध्ये झालेल्या त्या घटनेमुळे आपल्यावर शारीरिक आणि मानसिक आघात झाला होता. पण, त्यातून कसंबसं सावरत परिस्थितीचा कशा प्रकारे सामना केला, याचं वर्णन तिने या पोस्टमध्ये केलं आहे.
#metoo #comingout against all odds. Inspite of the all the comments, backlash and misogyny that will follow, I share my experiences below cos this is about a larger change! Bring it on ! #Speakup men and women . It's time. pic.twitter.com/xzjA8EnGjR
— sruthihariharan (@sruthihariharan) October 20, 2018
अर्जुनने मात्र श्रुतीने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'मी गेली कित्येक दशकं य़ा कलाविश्वात काम करत आहे. आजपर्यंत जवळपास ६०-७० अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यांच्यापैकी कोणीच तशी तक्रारही केलेली नाही. त्या माझा आदरच करतात', असं तो म्हणाला.
अर्जुनचं हे वक्तव्य आणि त्याच्यावर करण्यात आलेले आरोप अशी एकंदर परिस्थिती पाहता आता यावर श्रुती काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.