सनीनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनेही स्वीकारलं पालकत्त्वं, मुलीला घेतलं दत्तक

दित्या असं तिच्या मुलीचं नाव 

Updated: Oct 21, 2018, 07:35 AM IST
सनीनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनेही स्वीकारलं पालकत्त्वं, मुलीला घेतलं दत्तक  title=

मुंबई: अभिनेत्री सनी लिओनीने गेल्या वर्षी लातूरमधून एका मुलीला दत्तक घेत तिचं पालकत्वं स्वीकारलं. निशा असं सनीच्या मुलीचं नाव. फक्त सनीनेच नव्हे, तर इतरही बऱ्याच कलाकार मंडळींनी मुलं दत्तक घेत त्यांचं पालकत्वं स्वीकारल्याचं पाहायला मिळालं. याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. 

ती अभिनेत्री म्हणजे साक्षी तन्वर. 

विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री साक्षी तन्वर हिने एका मुलीला दत्तक घेतलं असून तिच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. 

मुख्य म्हणजे साक्षीने या मुलीचं एकल पालकत्वं स्वीकारलं आहे. त्यामुळे तिचा हा निर्णय सध्या कौतुकास्पद ठरत आहे. 

साक्षीने तिच्या मुलीचं नाव 'दित्या' असं ठेवलं असून, देवी लक्ष्मीचंच हे एक नाव आहे. 

साक्षीने मुलगी दत्तक घेण्याचा आनंद माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

'टाईम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधत तिने आई- वडील आणि मित्रपरिवाराचे आभार मानले. काही दिवसांतच आपली मुलगी नऊ महिन्यांची होणार असून तिच्या येण्याने एका आनंदपर्वाची सुरुवात झाल्याचं तिने सांगितलं. 

'दित्या' ही आपण आतापर्यंत केलेल्या प्रार्थनांचं फळ आहे, तिच्या येण्याने देवाचा आशीर्वादच मला मिळाला आहे, असं ती म्हणाली. 

साक्षीला सध्या कलावर्तुळातूनही तिच्या आयुष्यात आलेल्या या नव्या वळणासाठी सध्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.