मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता, जॉनी लीवर यांना कोणत्याही वेगळ्या ओखीची गरज नाही. बऱ्याच चित्रपटांमधून आपल्या विनोदी अभिनयाची झलक दाखवणाऱ्या लीवर यांनी कला जगतामध्ये स्वत:चं भक्कम स्थान तयार केलं आहे. चित्रपटांमध्ये येण्याआधी ते स्टेज शो करत होते.
हा प्रवास फार सोपा नव्हता. काही प्रसंग असेही आले, जिथं लीवर यांना मानसिक आणि भावनिक आव्हानांचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत जॉनी लिवर यांनी याबाबतचा खुलासा केला.
घरी दु:खाचं वातावरण होतं आणि...
जॉनी लीवर (Johny Lever) यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, बहिणीचं निधन झालेलं असतानाही त्यांना स्टेज शोसाठी व्यासपीठावर उभं रहावं लागलं होतं.
'माझ्या बहिणीचं निधन झालं होतं आणि तेव्हाच मला एक शो करायचा होता. मला वाटत होतं की शो रात्री आठ वाजता आहे. पण, अचानकच माझा मित्र आला आणि म्हणाला जॉनी भाई, शो रद्द झाला काय ?
मी म्हटलं, अरे नाही. शो तर रात्री 8 वाजता आहे. तेव्हा तो म्हणाला शो संध्याकाळी 4 वाजता आहे. अरे देवा... अशीच माझी प्रतिक्रिया होती.
घरी सगळे रडत होते. मी तिथून कपडे घेतले आणि हळूच बाहेर पडलो. टॅक्सीतच कपडे बदलले. तेव्हा माझ्याकडे कार नव्हती', असं लीवर म्हणाले.
त्या दिवशी परफॉर्म करणं कठीण होतं...
जॉनी (Johny Lever)पुढे म्हणाले, मी कार्यक्रमासाठी महाविद्यालयात पोहोचलो. तिथे विद्यार्थी स्वत:च्याच धुंदीत असतात.
त्या दिवशी मला परफॉर्म करणं कठीण वाटत होतं. मी त्या दिवशी कसं सादरीकरण केलं हे केवळ देवालाच ठाऊक.
माझ्यात इतकं धाडस कुठून आलं हे तोच जाणतो. हे आयुष्य आहे इथं काहीही होऊ शकतं. त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असावं', असं ते म्हणाले.
बहिणीचं निधन झालेलं असतानाही जॉनी लीवर यांनी त्यांच्या कामाप्रती असणाऱ्या समर्पकतेपोटी व्यासपीठावर उभं राहण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या निर्णयानं अनेकजण थक्कही झाले. पण, लीवर यांच्या मनात नेमका काय कोलाहल माजला होता हे मात्र तेच जाणतात.